Thursday, March 19, 2020

दगडी देव

______🙏__दगड_🙏_________

जी माणसं दगडात देव शोधतात ना त्यांला माझा त्रिवार मुजरा...

माणसांत देव शोधण्याचा दळभद्रीपणा चुकूनही करू नका.

अरे ती दगडाला
आपण  आपलं दुःख,भावना,व्यथा, स्थिती, परिस्थिती, सारं सारं सांगू शकतो... व्यक्त होऊ शकतो...

 मनातलं समदं वादळ शांत होऊन जातं... ते त्या मुर्तीवरच्या स्मितहास्यानं...

आपणचं रिबूट, रिफ्रेश करून नव्याने जीवन रिस्टार्ट करू लागतो.

ती दगडी मुर्ती आता आपलं व्यक्त होण्याचं हक्काचं माद्यम बनून जाते... आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जाते.

मांडतो कधी गाऱ्हाणं...
कधी सुख-दुःखांचा साधतो संवाद...

आनंदाची बातमी असल्यावर तर नकळत घेऊनच येतो निवद...

वाटोळे झाल्यावर डोके स्वतःचं त्याच दगडापुढं फोडतो...
तर चांगलं झाल्यावर कधी नारळही फोडतो...

कितीदा तरी आम्ही आमच्या भिकारपणाला, दरिद्रीपणाला आम्ही त्या मुर्त्यांनाच जबाबदार धरलेय...

आनंदाचे,ऐश्वर्याचे,भरभराटीचे दिवस आल्यावर मनोभावे ही पुजलेय...

जगाने बेदखल केलेली मने याच दगडी मुर्त्यांपुढे नतमस्तक होतात.

का तर ... इथं प्रत्येकाचीच गाडी ही दे धक्का स्वरूपाची आहे.

कोलमडून पडल्यावर...
वादळात सापडल्यावर...
माणसं सोडून गेल्यावर...
पूर्णतः हरल्यावर...
कोणीच नसल्यावर...
तर कधी एकटं पडल्यावर...

उरातल्या साचलेल्या तुफानाला पेलणं मुश्किल झाल्यावर...
तर कधी,
विरहाचे मेघ दाटल्यावर...

आमचा तारणहार, भाग्यविधाता, सुखकर्ता-दुखहर्ता हाच दगड बनून जातो.

माणसानं माणसाला माणसासारखं माणूसकीनं जगणं अपेक्षीत असताना...

 कांही लोक आत्मिक सुखाचा,स्वार्थाचा विचार करतात.

आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी मग बलाचा उपयोग करतात...

वरकरणी जरी ते सामर्थ्यवान,बलवान दिसत असले तरी मानसिकदृष्टया अशी अघोरी,विकारी,विषारी माणसं ही अंतःकरणातून खुपच हतबल, असाह्य झालेली असतात...

त्यांना आमच्या सोशिकता,सहनशिलतेमागचं यमक आणि गमक अजून पावेतो सापडलेलं नाहीय...

आमच्या अंधारमय जीवनात आशेचा किरण... आणणाऱ्या त्या दगडाला आम्ही याचे श्रेय केंव्हाच तर देऊन टाकलंय...

आम्हालाही कळतंय, दगड हा बोलत नाही...

पण बरंय ना तो तुमच्यासारखं बोलून अपमान करत नाही,

भावा-भावात,
गावा-गावात,
राष्ट्र- राष्ट्रात,
मना-मनात
भांडणं तरी लावत नाही...

तो आमचं ऐकून घेतो...
तो आम्हाला समजून घेतो...
आम्हाला मायेनं जवळ घेतो...
मनातली सारी आढी सरळ करतो....

त्याला ओवी गाणाराही प्यारा...
त्याला शिवी देणाराही प्यारा...
तोच व्यापलाय वाटतं विश्वात सारा...

एवढासा दगड तुमच्या अठरापगड जातीच्या उरावर मांडावासा वाटतोय...

माणसाला गोचिडासारखी चिटकलेल्या जातीला याच दगडाने ठेचावं वाटतंय...

तुम्ही आम्हाला वाळीत नसतं टाकलं...
समजून जर असतं ना घेतलं...
तर आज या दगडाला तुमचा बाप आम्ही केलंच नसतं...

आम्ही आता आमच्या सोईनुसार या दगडाला रुपं दिली आहेत...

दगडागणिक नावंही आता खुप दिली आहेत...

माणसा-माणसात जेंव्हा जेंव्हा भेद होतो...
प्रत्येक गटातटात,जन-समुहात नवा उद्वेग होतो...


बोलणाऱ्या माणसाने लुबाडल्याने, पुरतां उध्वस्त केल्याने...
आम्ही आता आमचं प्रतिनिधित्व दगडाला देतो आहोत...

आता तोच आमुचा हवाला,
रखवाला...
सबका मालिक,
ईश्वर,
परमेश्वर,
देव,
भगवान...

त्याच्याकडे उशिराने का होईना न्याय नक्कीच मिळेल याची शाश्वती दिलीय त्यानेच आम्हाला...


या दगडाने आम्हाला हळवे केलेय... आमचा श्वास -विश्वास-आस आता याच दगडात आहे.

याच दगडाने दिलीय जीवन जगण्याची शक्ती...
म्हणून कारणे आमची आहे या दगडावर भक्ती...

हवं तर मला मारा, कापा, जीवंत जाळा...
परंतू त्या दगडाला हात लावाल तर खबरदार....

चिंधडया... चिंधड्या करून टाकेन.

कारण
बरीच माझ्यासारखी समदुःखी,
समविचारी भक्तगण आहेत...

जी याच दगडाच्या भरवशावर तुमचा अन्याय गप्पगुमान सहन करत आहेत...

जीवण पाण्याचा बुडबुडा...
रिकामं आलो... रिकामंच जाणार...
मुठभर स्वार्थासाठी ...
मुठी आवळणाऱ्यांनो...

आमचं वैभव-साम्राज्य सर्वकांही घ्या...
आम्हाला भणंग भिकारी करा...

आम्ही सर्वत्याग करू, स्वार्थत्याग करू...

परंतु ज्या दगडाने आम्हाला माणूस केलंय ना...
त्याच दगडाने आमुची माथी नका भडकवू...
तुमच्या खुर्चीसाठी...
सत्तेसाठी...
राजकारणासाठी...

ठेवूनी मंदिरी दगड,
कांहींनी कमविला पैसा अडका रग्गड...

आम्हाला मात्र मुळ अस्सल दगड शोधायचाय...

जो पुर्वांपार, पिढ्यांन पिढया आमुच्या बापजादयांनी पुरुन ठेवलाय म्हणं...

दगडाच्या मुळावर उठलेल्या लोकांच्या भितीने...

आम्हाला जोपर्यंत तो मुळ दगड सापडत नाहीय ना...

तोपर्यंत थातूरमातूर,
शेंदूर फासलेल्या तुमच्या खरकाट्या दगडालाच नाविलाजाने पुजूबिजू... आम्ही...

आमुचा मुळ-पुरुषाचा परिसस्पर्श त्या दगडाला लाभलाय...

तोच दगड आमुचे आणि दुरीतांचे तिमीर जाऊन जीवनाचे सोने करील...

तो दगड ज्यांना कुणाला आजवर सापडला....
 ते ते साधू संत झाले, समाजसुधारक झाले, महापुरुष झाले, तथागत भगवानही झाले...

आपण सर्व एक आहोत,
सर्वाचा बाप एकच आहे...

असं कांही म्हणायचे खरंय,
पण आम्ही तो बाप शोधण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत...

दगड ना दगड... शोधतो आहोत...
दिंडी-दिंडीने...
पिढी-पिढीने...
बारी-बारीने...
वारी-वारीने...

©शब्दांकन -सुमित रवी सरवदे.
                 रत्नापूर,ता.परंडा,जि. उस्मानाबाद.
____________________🙏_____________
आपली मार्गदर्शक,प्रतिसात्मक, सुधारणात्मक प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...