Sunday, December 12, 2021

जगी सर्व सूखी असा कोण आहे 
विचारे मना तूचि शोधूनि पाहे 
मना त्वाचि रे पूर्वसंचित केले 
तयासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥

या जगात कोणचं सुखी नाही हे शाश्वत सत्य कळायला लागल्यापासून सुख जवाएवढे | दुखः पर्वताएवढे अशीही उव्दिग्न अवस्था होऊन माझी निराशाच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक व्हायची वेळ आली होती.

यातून मी सुटका करणेसाठी अवलंबिलेल्या मार्गापासून माझी आई, भावंडे, स्नेही, बंधूतुल्य मित्रवर्य, गुरुजन आणि आपल्या सारख्या मनमिळाऊ आभासी दुनियेतील वैश्विक मित्रांनी मला परावृत केले.

मी दुःखाचे समुळ उच्चाटन करणेसाठी अवलंबिलेला मार्ग.जो माझ्या तत्कालीन परिस्थितीतला एकमेव पर्याय होता -तो म्हणजे आत्महत्या.

होय, हाच एकमेव मार्ग तेंव्हा माझ्याहाती उरला होता. बहुधा नैराश्यातून आलेला एकटेपणा या मृत्यूंच्या दुतांनी माझे आत्महत्येविषयी प्रलोभने दाखवून उद्युक्त केल्याचे मला चांगलेच आठवतेय.

माझे अनुभवावरून तुम्ही मला साठ वर्षांचा म्हातारा समजताल. अहो कालच्या २ जुलैला तीसावं वर्ष लागलं.

जगात प्रत्येकाला स्वतःचेच दुःख मोठे वाटते. मलाही अगदी तसेच त्यावेळी वाटत असावे.

कुणी आपल्या दुःखामुळे सहानुभूतीपोटी माझ्याजवळ यावं. आंजारावं- गोंजारावं असं मुळीच मला वाटत नाही. उलट आपल्या दुःखाचं हसं व्हायला नको, त्याचं भांडवल व्हायला नको असंच मला वाटतं.

मी माझ्या दुःखाला वचन दिलेय. जोपर्यंत तु माझ्या सोबत आहेस दुःखा त्या एकलव्यासारखंच तुला स्मरण करून मी नक्कीच तुझ्यावर विजय मिळवीन.

पण लबाडा तु त्या धुर्त आचार्यासारखं अवचित घाला घालू नकोस बरं. मला सावध होऊ दे, सतर्क होऊ दे. मग बघ तुझ्याशी दोन हात करतो की नाही ते.

आणि खरंच सांगतो दुःखालाही माझे विचार पटले असावेत. कारण माझं माझं, मी- मी , म्हणणारे सोडून गेले. सुमित तुझ्यावर मायेची सावली धरू म्हणणारे जीवणातील कटू सत्याचा दाह अनुभवण्यासाठी उन्हात सोडून गेले.

मला त्या रखरखत्या उन्हाचंही कांहीच वाटलं नाही. कारण तो प्रखरतेजस्वी सूर्य म्हणजेच रवी यांचाच तर मी अंश आहे वंश आहे.

सुमित रवि सरवदे

मला माझ्यातच साक्षात्कार झाला. प्रत्येकात कस्तुरी असतेच. फक्त स्वतःत शोधता यायला हवी. असं माझं मत झालं.

सुमित- सु-चांगला, मित- मित्र = सुमित-चांगला मित्र.

रवी- सूर्य ( प्रखरतेज, सम्यकज्ञान, ब्रम्हज्ञान) तमस्सो मा ज्योतिर्गमय्

सरवदे ( सर्व दे)-देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. मग झोळीत आहे तेवढेच घे. अधिक हव्यासाच्या भाराने झोळी फाटून दान मातीमोल होण्याचीच शक्यता असते. आपले दान ( ज्ञान) सर्व या समाजाला दे म्हणजेच सर्व दे.

थोडक्यात काय तर मी माझ्याच नावाचा माझ्या जीवनाचा मुल उद्देश,मुलमंत्र म्हणून वापर करायचं ठरवलं.

पृथ्वी ही माता. आणि माता नित्य वंदिनियमाझी आई वंदना.

तर सुर्य म्हणजेच रवी हे पिता.

रवीवंदना यांचा पुत्र सुमित. अशा त्यावेळच्या माझ्या कल्पना ऐकून मी नक्कीच कशाचा तरी शोध लावतोयच आता असा फिल यायला लागलं. आणि हा फिल माझ्यात थ्रिल निर्माण करायचं काम कराय लागलं.

घरचे वेड लागलं असा निष्कर्ष काढून मोकळे झाले होतेच म्हणा?

त्या धक्क्यांतून मी अजून सावरलेलो नव्हतो.

दहावीत असताना वडिल रवी अजिनाथ सरवदे मला सोडून गेले.


माझ्या हातावरच त्यांनी जीव सोडला.१ मे २००७. लहान भाऊ दोन वर्षाचा होता. सायली, सुचित्रा लहान बहीणी. मीच थोरला.

तीस वर्षाची वडिलांनी स्थापन केलेली स्वतःची शिक्षण संस्था, पाचवी ते दहावीपर्यंतचे १०० % माद्यमिक शाळा तालुक्यातील पुढाऱ्याने लुबाडली.


२००७पासून ते आजतागात कोर्टकचेरीच्या तारखा, माझ्या वरिल खोटया केसेस.

२१ एप्रिल २०१० ला चुलते रमेश अजिनाथ सरवदे यांनी ही माझ्याच हातावर जीव सोडला.


०२ ऑगस्ट २०१२ माझी लहान बहिण सुचित्रा तापानं फणफणली माझ्याकडे उपचार करण्याएवढेही पैसे नव्हते. तशा परिस्थितीतही माझ्या सुचित्राने माझ्या गुड्डीने माझी मजबुरी हेरली होती. मला म्हणाली भैय्या, पैश्याची काळजी करू नको. मी बरीय मला काही होणार नाही. असा रडत बसू नकोस.

ज्ञानदेवांच्या मुक्ताईचं तिच्यात मला दर्शन घडलं.

भैय्या माझी शिष्यवृत्ती आलेली आहेच ना. ती उचलली ना की आपण दवाखान्यात जाऊ.

बघ ना रे, सगळ्यांच्या शिष्यवृत्त्या दिल्यात, पण माझीच मुद्दाम दिली नाही. किती कपटाने चालतात हे सगळे शिक्षक. आपल्याच पप्पांनी त्यांना एक रुपया न घेता शिक्षक म्हणून घेतलं. आणि त्याच संस्थापकाच्या संसारात, ताटात माती कालावली. इतकं कशी रे निष्ठूर वागू शकतात लोक. गुड्डी बोलताना डोळ्यातून आसवांची धार लागली.

कांही वेळात तिला रक्ताची उलटी झाली. मी खुप घाबरलो आई, बहिण सायली आणि लहान ६ - ७ वर्षाचा भाऊ . काय करणार. जवळ कोणंच नाही.

भयाण वाळवंटात निष्कारण, निरर्थक ओरडत होतोत.

दवाखान्यात न्यायला पैसे हवेत.

शाळेवर गेलो. माझ्या वडिलांनी स्थापन केलेली शाळा. मी त्यांना भिक मागणार नव्हतो. माझ्या गुड्डीची शिष्यवृत्ती तिचे हक्काचे पैसे तिच्यावरच उपचारासाठी मागणार होतो.

शिक्षक, मुख्याध्यापकांना विनंती केली. त्यांचेसाठी मी संस्थापकाचा मुलगा या अपेक्षेने नव्हे तर एक पालक या नात्याने बहिणीच्या शिष्यवृत्तीची मागणी केली.

त्यावर मुख्याध्यापक भोगील म्हणाले. मिळेल शिष्यवृती जरूर मिळेल पण या शाळेची जागा नावावर करुन दिली तर.

मला धक्का बसला. मरणाच्या दाढेत बहिण असताना तिच्या उपचारासाठी तिची शिष्यवृत्ती त्या शाळेच्या जागेच्या बदल्यात मिळेल म्हणजे. खुप मोठा निचपणा होता. जातियवाद होता.

मला अशा जातियवाद्यांची मुंडकी उडवावीत इतकी चिरड आली.

तेवढयात घरून निरोप आला. गुड्डीने हातपाय वाकडे केले. रक्ताच्या उलटया झाल्या.

इ.८वीमध्ये शिकणारी गुड्डी मला एकटयाला उचलत नव्हती. घराशेजारच्या मित्राच्या बहिणीने गाडी बोलवली.

जवळच्या दवाखान्याची सोय असलेल्या मोठया गावात नेलं. तिथून तालुक्याला हलवायला सांगितले. गुड्डी माझ्या मांडीवर होती. माझी धावपळ पहात होती. माझ्या नशिबानं चालवलेली थट्टा पाहून गुड्डी नुस्त रडत होती.

बोलता येत नव्हतं घसा आवाज द्यायला लागला. घर्रर घर आवाजानं काहीच चिरून काढलं.

रस्ता उरकत नव्हता. अवघं २५ कि.मी अंतरही अडीचशे तीनशे वाटू लागले.

आई, भावंडं रडत होती. त्यांच्यावर मी वेडयासारखं ओरडत होतो. गुड्डानं माझा हात घट्ट पकडला होता.

मी धावणाऱ्या रस्त्याशी नजर भिडू शकत नव्हतो. डोळ्यातलं पाणी रस्त्यावर सडा टाकल्यासारखं शिंपडत जावं तसं झालं.

तालुका आला. गर्दीतून वाट काडीत गाडी चालू लागली.आडवे येणाऱ्या प्रत्येकाचा मला राग येऊ लागल्यानं मी जनावरावर ओरडावं तसं ओरडू लागलो होतो.

दवाखान्याच्या दारात गाडी थांबली. दुसऱ्या मजल्यावर क्लिनिक. गुड्डीला बळेच उचलली पायऱ्या चढू लागलो.

गुड्डीनं एकाएकी घट्ट पकडलेला हात सैल सोडला. हिमालय चढून गेल्यासारखं झालं. दवाखान्याच लाल अधिकच चिन्हं ➕आपल्या अपेक्षांना , श्रध्देला व्दिगुणीत करून माझ्या गुड्डीला वाचव रे देवा. म्हणत रडत होतो.

परंड्यातून बार्शीला हलविण्यात आले.

खरेतर गुड्डीनं जिना चढत असतानाच जीव सोडलेला होता. पण वाटलं कदाचित बार्शीत भगवंताच्या कृपेनं जीव परत आला तर.

पण घोर निराशा.

माझी लाडकी गुड्डी सोडून गेली. ०२ ऑगस्ट २०१२ ला. वृतपत्रात बातमी आली.


सकाळ पेपर्सचे परंडा तालुका प्रतिनिधीच्याच मुलीची मृत्यूची बातमी किती दूर्दैवी आहे मी.

मी, आई, बहिण, भाऊ चौघे या दुःखाने खुप व्यतीत झालो. आणि त्यातच चौघांनाही टाइफॉईड झाला.

आईभावाला मी परंड्याच्या सरकारी दवाखान्यात अॅडमिट केले. तेवढयात सायली पण तापीनं घाळ झाली.

खिशात पैसा नसल्याने अनाळा उपकेंद्राच्या प्राथमिक आरोग्य सेवकाच्या हातापाया पडून परंडयाला आणले.

सायलीलाही अॅडमिट केले. सरकारी दवाखान्यात सुविधा नसल्याच्या सबबीवर लहान भाऊ सोनूला खाजगी दवाखान्यात अॅडमिट करावं लागेल असं सांगण्यात आलं. सोनूने मानाचा कळस टाकला होता. मी माझ्याकडच्या मोबाईलमध्ये त्याचे गुपचुप फोटो काढू लागलो. फोटो काढताना तिनं पाहिलं. का रे आज सोनूचं फोटो काढतोयस म्हणाली. त्यावर अगं गुड्डीचा फोटो काढणं जमलाच न.. न.. व्.. ह.. ता ना म्हणून. आई रडायला लागली.


सोनू मरणार म्हणून आम्ही डोमकावळ्यागत त्याच्या उशाशी बसलो होतोत.

ज्या सरकारी दवाखान्यात उपचाराची सोय नाही असे सांगणाऱ्या डॉक्टरांचाच खाजगी दवाखान्यात हलवायचा सल्ला त्यांनीच दिलेला होता .

हाकेच्या अंतरावर दवाखाना. जणू जीवन वाटायला लागले.

वडिलांच्या मित्रांनी मदत केली. माझ्या जीवलग मित्राने प्रविण मंगरुळेनी माझ्या सोनूचे प्राण वाचविले. त्याचे अनंत उपकार आहेत माझेवर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गिय वस्तीग्रहातून आम्हाला तीन वेळेला सकस जेवण मिळायला लागलं.

आमच्या पुनर्जन्मावरही त्याच बाबासाहेबांचे अनंत उपकार झाले.

आम्ही हळूहळू सावरायला शिकलो. दुनियादारी कळली.आपलंपरकं कळलं.

जामखेड येथे मला जॉब मिळाला. पैसे मागे पडू लागले. कितीही केला तरी बिनभरवशाचाच जॉब तो.

पैसे मागे पडले होते.

आई, बहिण सायली आणि मी काम करू लागलो.

सोनू इयत्ता ३रीत गेला.

मला राहून राहून भाऊंची ( वडिलांची) आणि गुड्डीची आठवण येत होती. चुलते तात्यांची ही. या तिघांचाही माझ्याच हातावर जीव गेला होता.

जन्म आणि मृत्यूचा चाललेला संघर्षाचा मी जीवंत साक्षीदार होतो.निराशेनं मी आत्महत्येचे प्रयत्न केले. वाचलो. वाचवलं.

मग विचार केला आपला कांहीच भरवसा नाही.आपल्यानंतर या तिघांच काय होणार. कसं होणार.

यातच २०१३ला सायलीचं लग्न केलं. मामाचाच मुलगा.परिस्थिती सुधारेल. तिचं कोणीतरी काळजी घेणारं भेटलं. आपली काळजी थोडी कमी होईल वाटलं.


तिच्या थोरल्या दिरानं लग्नासाठी ऊसतोडीची उचल घेतली होती. बापजल्मात शेतात पाऊल न ठेवलेल्या सायलीला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ऊसतोडीला जावं लागलं. कधीच आईपासून, भावंडांपासून दूर नसलेली सायली कर्नाटकातील बेळगांव ला गेली.

मला तिची खुप आठवण येत होती. मकर संक्रातीचं निमित केलं चार पाच साडया, पावडरतेल, तसंच किराणा राशन घेऊन गेलो.कोपीवर सायली एकटीच खुप आजारी असल्यासारखी दिसायला लागली. मी तिचं हातानं वाटोळं केलं होतं.

ती मला पाहून खुप खुप खुष झाली. अक्षरश : दोघही मनसोक्त रडलो.

कामानं वाळून गेली होती.आता तिच्यात निष्टूर दुनियेला झुंजायचं सामर्थ्य परिस्थितीतून अनुभवातून आलं होतं... माझी लहान बहीण असूनही जगाची उफराटी रीत तिलाच माझ्यापेक्षा जास्त कळली होती.

कांही दिवस राहिलो. अन् गावाकडे निघायचा दिवस आला. माहेरवाशीन म्हणजे काय? सासरवास म्हणजे काय याचा प्रत्यय त्या दिवशी आला. जड अंतःकरणानं निरोप घेतला.

मी नंतर रिटेल मॅनेजमेंट केले.बी.एस्सी चा विद्यार्थी असून पुढिल शिक्षण घेणे शक्य नसल्याने व्दितीय वर्षातून सोडले. मुक्त विद्यापिठातून बि.कॉम केले. शिवाय डि. टि.एड ही केले.

डि. टि.एड च्या शेवटच्या पेपरच्या दिवशी आजोबा दारात घसरून पडले. खुबा मोडला. त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं. पेपर बुडाला.

यानंतर पोटापाण्याचा यक्षप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सिप्ला फार्माटिकल कंपनीत जॉब करू लागलो.

पुन्हा जीवंत प्रेतासारखं जीवनक्रम जगू लागलो. मनव्यक्त करावं बऱ्याचदा वाटायचं. तसं कोणीच भेटलं नाही.एकाकी एकलकोंड्या सारखं वाटायला लागलं. उरात अनंत वादळे होती.

निवांत एखाद्या डोंगरावर जावं निर्जनस्थळी मोठ्यानं ओरडावं. खुप रडून रडून या डोळ्यातल्या सप्तसिंधूना अंतर्धान करावं.

कोंडमारा होत होता. आधार देणारा कोणीच नव्हता.

अशातच माझ्या आयुष्यात ती आली. माझी परिस्थिती पाहिली. आणि माझी अर्धांगिनी बनली. ३० डिसेंबर २०१४ला लग्न झालं.

आता सर्वकांही सुरळीत होईल. माझ्या हितचिंतकांनी भरभरून आशिर्वाद दिले. हमसून रडलेही. आता या रडारडीचा मला वीट आला होता.

आपला आपण करावा उद्धार तरावया पार भव सिंधू म्हणत अंग झटकले. आपल्या शीरावर कोणाचा हात नसला म्हणून काय झालं आपण धरु आपल्यांसारख्यांवर.

शाळेसंबंधी समजलं १ मे २००७ ला वडिल गेले. आणि शाळा लुबाडणाऱ्याने २२ जुन २००७ रवी सरवदेंची शाळा हस्तांतरणाला संमती, शिफारस, प्रोसेडिंग बुक, सभेचे नोटिस बुकवर मयत वडिलांच्या बनावट सहया.

आम्ही त्यां संस्था हस्थांतरण विरोधात अपिल केले. यावर सुनावणी झाली बरीच वर्ष लोटली आणि जवळजवळ तीन चार वर्षांनी हस्थांतरण रद्दचे आदेश आले. वडिलांचं स्वप्न पुर्ण करणे हेच माझं स्वप्न आहे. ते आता साकार होईल असं वाटलं. पण त्या पुढाऱ्याची लॉबी, नातेवाईक यांमुळे हे स्वप्न विरले.जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आणि हसू आलं.

अगणित दुःखे, संकटे पचवलेल्या माझ्या मनाला तिनं कधी अगतिक होऊच दिले नाही...

यायची निराशा जेंव्हा जेंव्हा, कांहीही असो पण एकटे कधीच पडू दिले नाही...

मला सावरायला ती, तर तिला सावरायला मी असतो...

कालपरवा तिनं मला विश केलं, आज मी तिला विश करतो...

खरंच सांगतो, माझ्या वयाच्या पंचेवीस वर्षापर्यंत...

तिचा अन् माझा दूर दूरपर्यंत कसलाच संबंध नव्हता...

कितीदा आम्ही नकळत जवळून गेलो ही असतोल एकमेकांच्या , पण आयुष्यभराचे जीवनसाथी होतोल. गंधही नव्हता...

आज तिचा वाढदिवस... काय देऊ हे आयुष्यही, हे हास्यही, आणि जगण्याचे रहस्य ही तिचीच तर देण आहे...

माझ्या अपेक्षा कधीच मोठया नसतात... पण माझी लहानातील लहान अपेक्षाही जपण्यात तिला कमालीचा आनंद वाटतो...

माझी स्वतःची कांहीच स्वप्न नाहीत... माझं एकमेव स्वप्न तेही माझ्या वडिलांची सारी स्वप्ने सत्यात उतरविण्याचं... हे माझं स्वप्न पूर्ण होण्याचं ती स्वप्न पाहते...

माझं माझं म्हणणाऱ्या माणसांच्या जगात,कांहीवेळा नातं जणू कबाड ओझंच वाटू लागतं ना... तेंव्हा नातं तिचं नि माझं अतुट अनाकलनिय असल्याचं पटू लागतं...

आम्ही आहे त्यात समाधानी असतोत... जे गेले त्यासाठी कधीच दुःख करत बसत नाहीत...

जेंव्हा जेंव्हा मनात कांही साचून राहते... तेंव्हा तेंव्हा अव्यक्त भावही ती वाचून जाते...

मी अनेकांना सांभाळलं(अर्थ चांगल्या हेतूने बरं) पण या सुमितला सांभाळणं म्हणजे खायचं काम नाही... असं भेडावणाऱ्या साऱ्या भाकडकथांना तिनं झुगारून मला स्विकारलं आणि साकारलंसुध्दा...

खरंतर हे सर्व आयुष्यात स्थिरावल्यावरच बोलायच्या गोष्टी आहेत... पण विंचवासारखं पाठी बिऱ्हाड घेऊन पोटासाठी भटकणाऱ्या या व्यथेचा अंत आहे की नाही, याची शाश्वती नसणाऱ्या आमच्यातील धैर्याने, सोशिकतेने आम्ही प्रत्येक दिवस साजरा केला.

माझ्याकडे कांहीच नाही म्हणत असणाऱ्यांनाही, तिनं माझ्यात कांहीतरी असल्याची जाणिव करून दिली.

आयुष्यात आल्याने खरंच सुखांची एवढी बरसात झाली, माझ्या फाटक्या, दुबळ्या झोळीतून ओसंडून वाहणाऱ्या सुखांनो... !

अनमोल असूनही मातीमोल आयुष्य जगणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकांच्या जीवनात कधी ना कधी नवाकुंर येतो, नवी पालवी फुटते, आपण आहोत तसेच स्विकारून जेंव्हा आपल्यावर, कोणी भरभरून प्रेम करणारी भेटते, जीव जपणारी भेटते, आपल्यात दडलेल्या बालहट्टाचे लाड करणारी, आंजणारी, गोंजारणारी भेटते...

मी त्यामाने खुप खुप नशिबवान आहे, असं म्हणायला कांही हरकत नाहीय.

तर अशा माझ्या सुविद्य, सर्वगुणसंपन्न लाडक्या, प्रेमळ बायकोला उदंड आयुष्याच्या अनंतकोटी शुभेच्छा.

(टिप : हे सर्व तिच्या दबावापोटी, तिच्याच सांगण्यावरुन लिहीत आहे. असं कांही समजू नका, कधी भावना उचंबळून येतात, अन् शब्द खेळून जातात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिनं शांततेचं सहकार्य केल्याची परतफेड म्हणून मी हा स्तूती करण्याचा आटापिटा केलेला आहे. यात जरासही कमी पडलो तर ...😬 बापरे शुभ शुभ बोला... किमान आजच्या दिवशी तरी... नाहीतर चंद्रमुखीची ज्वालामुखी कधीही होऊ शकते. असो )


कंसात लिहलेले माझे 'स्वगत' तसेच मनात दाबत बायकोला पुनश्च शुभेच्छा🎉🎊🎂🎊🎈🎀🎁🎉🎊

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...