Friday, July 3, 2020

सावली

#सावली


प्रखर रवितेज पाठीशी असल्यावर, आपली सावलीही पायदळी येते...
वितळूनी जावा देह मेणाचा, अहंमपणाचेही अगदी तसेच तर होते...
.
बापाची सावली कधी पडलीच नाही...
वाटायचं याचं आस्तित्व आहे की नाही...
.
तु काळजी करू नकोस सुमित, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी अगदी सावलीप्रमाणे म्हणणारे ....काळोखात साथ सोडून देतात... आणि आपण धडपडत राहतोत... निराधारासारखं ...
.
आधार देणारेचं जर गद्दार झाले तर... दाद मागावी कोणाकडे...
.
परंतू परक्याचं ठिक आहे हो... परके हे कितीही केले तरी परकेच...
.
पण जन्मदात्या आईवडिलांचं काय...
.
ठरलं, आज भाऊंना( वडिलांना )दाद मागणारच ...!
.
मी त्यांच्या विस्कटलेल्या थडग्यांजवळ गेलो... विचारलं तुम्ही तरी किमान माझी सावली बनायला हवं होतं...?
.
त्यावर आकाशवाणी व्हावी अगदी तसंच कांहीसं झालं, ओळखीचा आवाज आला... सुमीत, ऊठ... माझ्यावर तुझा राग असणं स्वाभाविक आहे...
.
पण मी तुझी सावली बनू शकलो नाही, याचं वाईट वाटून घेऊ नकोस...?
.
तु "रवीअंश"आहेस... "रवीवंश" आहेस...
.
माझे रवीतेज सदैव प्रखरतेने तुझ्या पाठीशी असेल...
.
प्रकाशात वस्तूची प्रतिमा,प्रतिकृती,पडछाया म्हणजेच तर सावली असते ना रे बाळा...
.
सावली छायेची असते... सावली मायेची असते...
सावली पाठीराख्यांची असते... सावली आपल्यातील परक्यांचीही असते...
.
जोपर्यंत प्रकाश, तेज, तोपर्यंतच सावली असते...
जोपर्यंत ज्ञान, वैभव, आरोग्य तोपर्यंतच सख्य आणि सौख्य असते...
.
माझ्या प्रकाशात तुझे स्वत्व, सत्व, तत्व यांचे महत्वही उजाळून निघेल...
.
परंतू सावल्यांच्या जीवघेण्या खेळात न पडता... तु स्वयंप्रकाशीत व्हावंस असंच मला वाटतं...
.
तेंव्हा " अत्त:दीपभव- स्वयंप्रकाशीत हो.

उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा बायको.

अगणित दुःखे, संकटे पचवलेल्या माझ्या मनाला तिनं कधी अगतिक होऊच दिले नाही...

यायची निराशा जेंव्हा जेंव्हा, कांहीही असो पण एकटे कधीच पडू दिले नाही...

मला सावरायला ती, तर तिला सावरायला मी असतो...
कालपरवा तिनं मला विश केलं, आज मी तिला विश करतो...

खरंच सांगतो, माझ्या वयाच्या पंचेवीस वर्षापर्यंत... 
तिचा अन् माझा दूर दूरपर्यंत कसलाच संबंध नव्हता...

कितीदा आम्ही नकळत जवळून गेलो ही असतोल एकमेकांच्या , पण आयुष्यभराचे जीवनसाथी होतोल. गंधही नव्हता...

आज तिचा वाढदिवस... काय देऊ हे आयुष्यही, हे हास्यही, आणि जगण्याचे रहस्य ही तिचीच तर देण आहे...

माझ्या अपेक्षा कधीच मोठया नसतात... पण माझी लहानातील लहान अपेक्षाही जपण्यात तिला कमालीचा आनंद वाटतो...

माझी स्वतःची कांहीच स्वप्न नाहीत... माझं एकमेव स्वप्न तेही माझ्या वडिलांची सारी स्वप्ने सत्यात उतरविण्याचं... हे माझं स्वप्न पूर्ण होण्याचं ती स्वप्न पाहते...

माझं माझं म्हणणाऱ्या माणसांच्या जगात,कांहीवेळा नातं जणू कबाड ओझंच वाटू लागतं ना... तेंव्हा नातं तिचं नि माझं अतुट अनाकलनिय असल्याचं पटू लागतं...

आम्ही आहे त्यात समाधानी असतोत... जे गेले त्यासाठी कधीच दुःख करत बसत नाहीत...

जेंव्हा जेंव्हा मनात कांही साचून राहते... तेंव्हा तेंव्हा अव्यक्त भावही ती वाचून जाते...

मी अनेकांना सांभाळलं(अर्थ चांगल्या हेतूने बरं) पण या सुमितला सांभाळणं म्हणजे खायचं काम नाही... असं भेडावणाऱ्या साऱ्या भाकडकथांना तिनं झुगारून मला स्विकारलं आणि साकारलंसुध्दा...

खरंतर हे सर्व आयुष्यात स्थिरावल्यावरच बोलायच्या गोष्टी आहेत... पण विंचवासारखं पाठी बिऱ्हाड घेऊन पोटासाठी भटकणाऱ्या या व्यथेचा अंत आहे की नाही, याची शाश्वती नसणाऱ्या आमच्यातील धैर्याने, सोशिकतेने आम्ही प्रत्येक दिवस साजरा केला.

माझ्याकडे कांहीच नाही म्हणत असणाऱ्यांनाही, तिनं माझ्यात कांहीतरी असल्याची जाणिव करून दिली.

आयुष्यात आल्याने खरंच सुखांची एवढी बरसात झाली, माझ्या फाटक्या, दुबळ्या झोळीतून ओसंडून वाहणाऱ्या सुखांनो... !

अनमोल असूनही मातीमोल आयुष्य जगणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकांच्या जीवनात कधी ना कधी नवाकुंर येतो, नवी पालवी फुटते, आपण आहोत तसेच स्विकारून जेंव्हा आपल्यावर, कोणी भरभरून प्रेम करणारी भेटते, जीव जपणारी भेटते, आपल्यात दडलेल्या बालहट्टाचे लाड करणारी, आंजणारी, गोंजारणारी भेटते...

मी त्यामाने खुप खुप नशिबवान आहे, असं म्हणायला कांही हरकत नाहीय.

तर अशा माझ्या सुविद्य, सर्वगुणसंपन्न लाडक्या, प्रेमळ बायकोला उदंड आयुष्याच्या अनंतकोटी शुभेच्छा.

(टिप : हे सर्व तिच्या दबावापोटी, तिच्याच सांगण्यावरुन लिहीत आहे. असं कांही समजू नका, कधी भावना उचंबळून येतात, अन् शब्द खेळून जातात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिनं शांततेचं सहकार्य केल्याची परतफेड म्हणून मी हा स्तूती करण्याचा आटापिटा केलेला आहे. यात जरासही कमी पडलो तर ...😬 बापरे शुभ शुभ बोला... किमान आजच्या दिवशी तरी... नाहीतर चंद्रमुखीची ज्वालामुखी कधीही होऊ शकते. असो )
कंसात लिहलेले माझे 'स्वगत' तसेच मनात दाबत बायकोला पुनश्च शुभेच्छा🎉🎊🎂🎊🎈🎀🎁🎉🎊

आजवर किती मराठी चित्रपटांनी 100 कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त उलाढाल केली आहे?

फोटो स्त्रोत- गुगल

महागाई आणि रेपो रेट जर संदर्भ म्हणुन पकडला नाही तर दुर्दैवाने फक्त 1 चित्रपट 100 कोटी चा पल्ला पार पाड्ण्यात यशस्वी ठरला आहे आणि तो म्हणजे नागराज मंजूळे यांचा सैराट.

सैराट चित्रपट बनवायला लागले साधारण 3 कोटी आणि बाकी सगळा नफा

सैराट चित्रपटा सोबत Relase झालेले बोलिवूड चे हिन्दी चित्रपट सुद्धा 100 कोटी कमवू शकले नाही जस की बागी हा टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर सारखी दानदनीत स्टार काष्ट असलेला सुद्धा सैराट पुढे ठसला आणि 60 कोटी मजल मारु शकला (किय्तेक पटिने Screen जास्त असुन सुद्धा )

सैराट मुळे एक मराठी चित्रपटासृष्टीला एक मानबिन्दू प्राप्त झाला आणि खूप नाव उंचावले गेले

माझी अपेक्षा आहे की इतर भाषे प्रमाणेच मराठी मधील चित्रपट सुद्धा बाहुबली सारख्या चित्रपटांना भविष्यात मागे टाकतील.

सैराट चित्रपटानं 100 कोटींची कमाई 3–4 वर्षांपूर्वी केली. त्यावेळी तिकीटांचा किमती 100 ते 200–300 पर्यंत होत्या. परंतु याचाही पुढं गेलेला चित्रपट माझ्यामते एकच - सप्टेंबर 1988 ला आलेला अशी ही बनवाबनवी

31 वर्षांपूर्वी 3 रुपयांचा तिकिटावर 3 कोटींचा व्यवसाय केला होताया मास्टरपीसनं. तेव्हाची किंमत अन त्याकाळी असलेल्या चित्रपटगृहांची संख्या पाहिलं तर हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

आत्ता सुद्धा कधी टीव्हीवर लागला तरी कितीही वेळा पाहूनही कंटाळा येत नाही. अशोकमामा, सचिन सर, लक्ष्या सर , विजू खोटे सर, सुधीर जोशी सर अन साऱ्याच कलाकारांचा धमाल अभिनय आहे . साऱ्यांनाच धन्यवाद.

ता. क. धनंजय माने इथेच राहतात का ?

माहेरची साडीचा त्याकाळातील उलाढाल १२ करोड होती. मी नंतर एका वेबसाईटवरून १९९१ ते २०१९ महागाईप्रमाणे अंदाज केला तो जवळपास ९३ करोड अस दाखवतय. पण हा अंदाज झाला.

संकलन : सुमित रवि सरवदे


बौद्ध किंवा महार समाजातल्या मुलाला किंवा मुलीला इतर कोणत्याच जातीतील स्थळ का नाही मिळत?

हा प्रश्न विचारताना जरा तरी विचार करावा..

इतर जातीतला जोडीदार हवाच कशाला?

सध्याचा काळ संक्रमण काळ आहे, जात हा दुय्यम प्रश्न झालाय जर तुमची आर्थिक स्थिती जोडीदाराच्या पेक्षा जास्त चांगली असेल तर तिथं जात पाहिली जात नाही.. अन त्यात काय चुकीचं आहे असं वाटत नाही.. जर एखादी मुलगी सधन घरातली असेल अन ती त्या पेक्षा कमी पैसा असणाऱ्या घरात आली, तर प्रेम संपेल 4 दिवसात.. पाचव्या दिवशी सहन होणार नाही (सैराट मध्ये आर्ची सार्वजनिक शौचालय मध्ये जाते तो सीन आठवा, मला किडा मुंगी सारखं जगायचं नाही म्हणते)

लग्न हा जगातला सर्वात मोठा व्यवहार आहे.

अन तुम्ही जर फक्त बौद्ध/महार जाती बद्द्ल विचारत आहात, मी जे सांगत आहे ते लक्षात ठेवा..

इतर जातीतील लोक जेव्हा वधू-वर जाहिरात देतात तेव्हा लिहलेलं असतं आंतरजातीय चालेल अन टीप : SC ST क्षमस्व

मग तुम्ही जर कमावते असाल तर तुम्ही दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न केल्याने स्वजातीतील एका मुलीचं नुकसान करत आहात.. कारण , आंतरजातीय विवाहात बहुअंशी विवाहात मुलगा SC ST असला तर मुलगी open NT असते.. पण SC ST मुलगी open कॅटेगरी च्या घरात जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे..

आता, कुणाला वाटेल की मी जातीवादी बोलते.. sorry to say मित्रांनो, मी खरं अन प्रॅक्टिकल बोलते.. Idololgy कितीही गोड वाटली बोलायला तरी सत्य हेच आहे, की जी जात नाही ती जात…

तसेच हे ही सांगून ठेवते की, ब्राम्हण समाजाच्या नावाने बोंबा मारू नका (मी ब्राम्हण नाही), कारण जाती त्यांनी निर्माण केल्या तरी त्यांची जोपासना इतर जातींनी केली आहे.

 तसं नसतं तर *अखिल भारतीय अमुक तमुक समाज संस्था/ ज्ञाती बांधव संघटना* अस्तित्वात आल्या नसत्या.. ब्राह्मण लोकांच्यातले चांगले गुण घ्या, राहणीमान, विचारसरणी अवगत करा.. अन या उत्तरात नवीन उदाहरणे सांगू नका कारण नियमाला अपवाद असतात.. जे जास्त प्रकर्षाने जाणवतं त्या बद्दल मी बोलले आहे.

साभार : क्वोरा

संकलन : सुमित रवि सरवदे

Tuesday, June 30, 2020

महाराष्ट्र हे नाव कसे पडले यावरील जातीयव्देषभावनेतून दिलेली उत्तरे वाचून मला वाटते.

महाराष्ट्र असो की भारत. प्रत्येकजन या महान राष्ट्रांला,देशाला जातीय दृष्टीकोनातूनच का पाहतात हेच मला कळत नाही. खरं तर आपल्यात आपल्याच माणसांशी आकसपणा नेहमीच दिसतो, जातीचा गर्व, माज दिसतो. व्देषभावना दिसते. घरातल्यांशी, समाजाशी भांडायचं आणि परका बोकांडी घ्यायचा ही पिढीजात खोड सर्वांनाच वारसा हक्कानेच मिळाल्यागत भूषन मिरवतात.

कोणतीही महान गोष्ट,कृती,घटना इतकेच काय व्यक्तीही या जातीयवादी सडक्या मेंदूने सोडल्या नाही. महान गोष्टीबद्दल आपल्याच सडक्या मेंदूने इतिहास पाजळणाऱ्या नव्या स्वयंघोषित'अपवाद' इतिहासप्रेमींची तर कीव येते.

स्वजातीचा उदो उदो करण्यात जो तो धन्यता मानण्यात व्यस्त असताना आपणच उगाच डोकं आपटून घेणं, मुर्खपणाचं ठरेल.

परिस्थितीशी नव्हे तर जातीयवादी,मनूवादी विचारसरणीशी सर्वांनाच संघर्ष करावा लागला आहे,लागतो आहे. जो व्यक्ती समाजविघातक,बुरसट चालीरितींना विरोध करतो.


 धर्म आणि संस्कृतीच्या नावाचं आकर्षक कव्हर लावलेल्या मनुवादी कुटिल विचारांना, जातिय, धार्मिक तेड निर्माण होणाऱ्या विचारांना जो धिक्कारतो, बहिष्कार करतो. अशां महान व्यक्तिंना वाळित टाकलं जातं. त्यांचा अतोनात छळ केला जातो. देशद्रोही, धर्मद्रोही ठरवलं जातं. त्यांची हत्या केली जाते.. इतिहास साक्षी आहे.

या वाळित टाकलेल्या महान व्यक्तींना शोषित, पिड़ीत, आणि आधीच गावाच्या, गावकुसाच्या बाहेर खितपत पडलेल्या पशुपेक्षाही हिन जीवन जगणाऱ्या मुळनिवासी ज्यांना परकियांने शुद्र ठरवले, आणि बहुजन समुदायाचेच एक अविभाज्य अंग असलेल्या जाती जमाती. ज्या केवळ परकिय आकरमाशी औलादांच्या व्देषाने बहिष्कृत ठरल्या. अशा दीनदुबळ्यांच्या लोकवस्तीत येऊन राहण्याशिवाय पर्यायच नव्हता ना !

आपल्या जाती, धर्मातलं थोतांड दुर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, स्वजातीय व्यक्ती जेंव्हा जातीच्याबाहेर, समाजाच्या बाहेर बेदखल केल्या जातात. तेंव्हा त्यांची अवस्था त्या बहिष्कृत, शोषित-पिडीत, शुद्रांगत होते.

स्वतः दुःख भोगल्याशिवाय त्याची जाणिव होत नसते.अगदी तसंच काहीसे त्या महान व्यक्ती स्वतःच्या माणसांनी वाळीत टाकल्यावर त्या शोषितांच्या वस्तीत येऊन राहिले. त्यांच्यांशी प्रेमाने वागू लागले.

आपल्या ज्ञानाने, त्यांच्या दुःखावर माणूसकीची फुंकर मारू लागले. विशेष म्हणजे हे महान व्यक्तींना सर्वांनी श्रेष्टत्व बहाल केले. आणि माणूस जगविख्यात होऊ लागला की, जातीयवादी किडे, ती महान व्यक्ती आमच्या जातीची आहे म्हणत जणू कॉपीराईट लावते, त्या महान व्यक्तीच्या आचार- विचारांचं जणू जातीयवाद्यांनी पेटंटच उचललं असंच वाटतं.

आणि प्रत्येक महापुरुष,संत,भारत२त्न हे जातीजातीचे-धर्माधर्माचे एक प्रॉडक्ट बनविले. आज माणसांपेक्षा जातच श्रेष्ट आहे.

आम्हाला परकिय उरावर चालतील हो. पण हजारो पिढयानपिढया पायदळी तुडविलेले शिरावर गेलेले नाही चालणार.

महाराष्ट्र नावामागचा इतिहास सांगताना सगळ्यांची उत्तरे वाचली. जातियता सर्वांच्यातच ओतप्रोत भरल्याचं प्रकर्षानं जाणवलं. अगदी हिणकस उत्तरे. शास्त्र संदर्भाचा आधार देऊन दिल्याचं जाणवलं.मी कोणाचीच बाजू घेणार नाहीय.

जो सत्य जाणतो तो मौन राहतो.स्मितहास्य करतो. सबका मालिक एक है हे मीही जाणतो.

मला व्याकरण दृष्टया शास्त्रशुद्ध लिहिता येत नसेल, त्यांच्यासारखे संस्कृत संदर्भ देता येत नसतील. परंतू माझे लेखन हे अस्सल माझेच आहे. नो कॉपी पेस्ट.

परंतू मी गर्वाने सांगू शकतो मी आखिल मानवजातिचे कल्याणार्थ झटणाऱ्या त्या सबंध महान व्यक्तींचा वारसदार आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित या महानराष्ट्र महाराष्ट्राचा सुजाण, सजग नागरीक आहे.

जो इतिहास पुन्हा जातिय, धार्मिक तेढ निर्माण करणारा असेल तो इतिहास गाढून टाका.

सुमित रवि सरवदे.

Sunday, June 28, 2020

म्हारड्यातल्या कुणालाच लग्नात बोलवायचं नाही?

म्हारड्यातल्या कुणालाच लग्नात बोलवायचं नाही?

" राग आला तरी चालंल, पण लग्नाला "त्यांला" बोलवायचं नाही".. म्हारड्यात रोग आलाय?
.
आधीच लॉकडाऊन आहे,राग-लोभ,मान-पान आता समदं इसरा.. गिन्यान पाजळणारी ती २१ व्या शतकातली बया, स्वतःला स्वयंघोषित क्रांतीकारक, समाजसुधारकच जणू समजत होती...
.
गोरगरिबांचं लुबाडणाऱ्या औलादीं, हिणकस वागतात तेंव्हा खरंच किळस येते अशा बिनडोकांना जन्माला घालणाऱ्या थोर माता- पित्यांची...
.
"जात"- कोरोनापेक्षाही हजारपटीने भयंकर आहे.

पोटापाण्यासाठी गाव सोडलेल्या कित्येकांच्या लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलीय...
.
साधं सर्दी पडसं ताप अशांसाठी पण पैसे नसतात... सरकारी दवाखाने, तर गलेलठ्ठ पगारानं उर्मट आणि उद्धट बनलेल्या कर्मचाऱ्यांमुळे, रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणल्यासारखंच कांहीशी स्थिती असते... परंतू नाविलाज असतो किंवा खाजगीसेवा परवडण्याजोगी नसते म्हणून सहन करतो. सगळेच सरकारी कर्मचारी वाईट नसतात, परंतू अशा ' चांगल्यांचे' संख्याबळ खुपच कमी आहे. दुर्देवाने वस्तूस्थिती आहे.

पोटाची उपासमार, बेरोजगारी यामुळे आधीच हैराण झालेला तो.. गल्लीत कोरोनासदृश्य संशंयीत आढळल्याने जीव मुठीत घेऊन गावाकडे आला...
.
आंधळी आई, बायकांपोरं विंचवाप्रमाणे बिऱ्हाड पाठीवर घेऊन गावाकडं निघाला...
.
वाटेत एक दोघांनी हात केला, तेंव्हा सर्व वाहतुकीची साधनं बंद असल्याने साहजिकच गाडीभाडे वाढले होते...
.
तेवढेच चार दोन पैसे मिळतील म्हणून त्यानं त्या दोघांना गाडीत घेतलं...
.
गावाच्या बाहेर रानात ठाणं मांडलं...

कारण गावात आपल्याला घेतील का?
या शंकेनं त्याला पुन्हा बिथरायला भाग पाडलं...
.
माणूस आपला असतो पण रोग नाही...

हे त्याला समजत होतं... पावसा पाण्याचं दिवस, कडाडणाऱ्या विजा, वा-यानं तर कित्येकांची वरवंडी फोडून पत्रे भिरकावून लावली होती...
.
गावात अलगीकरण कक्ष नाही... पर्यायी आणि शासनाची जबाबदारी म्हणून जिल्हा परिषद शाळा...
.
परंतू त्यातही राहण्यास कानकुन करणारी " कशाला आलंय मरायला, म्हणत माणूसकीही नावालाच असल्याची जाणिव करुन देत होती...

त्याचं कुंटूब वादळात उघडयावर होतं...

उघडया माळरानावर होतं...

गडया आपला गाव भला, म्हणत जीवाच्या आकांतानं, मोठया आशेनं तो, काम नाही मिळालं तर गावात टूकडं मागून खाईल... म्हणत आला खरा...
.
पण त्याला गावातलं राजकारण, गावगुंडया, सगळं जातीभोवतीचं वर्तुळाकार फिरतं हे त्याला उशिरानं कळायला लागलं...
.
जातीमुळं वाळीत टाकलं की जातीची माणसं पाठबळ देतात...
.
ज्या जातीमुळे कमी लेखलं जातं त्याच जातीचा सगळ्यात जास्त गर्व बाळगला की जातीचा दर्जा उंचावतो म्हणे...!
.
शेवटी एकानं म्हणलंच तुमची माणसं जिल्हा परिषद शाळेत आणि आमच्या माणसांला उघडयावर, वाऱ्यावर असं का?

कोरोना जात-पात, गरिब-श्रीमंत बघतो व्हयं... पण सडक्या मेंदूत थोडीच घुसणार व्हतं...
.
कसंबसं शाळेत घेतलं जातं...
.
पण त्यात अजून एक संकट डोकावतं... रात्रीच त्याला पोलीस अन् आरोग्य कर्मचारी उचलून घेऊन जातात...

गावात सगळीकडेच भितीचं वातावरण एव्हाणा बनलेलं असतं... माणूस मरेपर्यंत प्रसिद्धीचा भुकेला असतो... पण प्रसिध्दी काही केल्या होत नसते, पण अफवा आणि बोभाटा तुफानी वाऱ्यागत पसरतो...

त्याला घेऊन गेल्यानंतर चौकशीअंती समजतं... की चार दोन पैशाच्या आशेनं त्यानं गाडीत बसवलेले ''ते दोघे" कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

आता गावाला कोरोना होणार... म्हारवाडयात कोरोना आला... या अफवेनं गावाला पछाडलं जातं...
.
उघड नाही पण अप्रत्यक्षरित्या पुन्हा जातियतेचा कुटिल बनाव करण्याचा सुवर्णयोगच जणू कांही जातियवादी बांडगुळांना सापडला...
.
म्हारवाडयातल्या कुणालाच लग्नाला बोलवायचं नाही, राग आला तरी चालंल... सुशिक्षीतपणाचा दिखावा करणाऱ्या दळभद्री बयेनं ओकल्यावर कोण जाईल लग्नाला...
.
यांचा दांभिकपणा, ढोंगीपणा  खराच वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल...

हगणाऱ्यापेक्षा बघणाऱ्यानंच लाज बाळगावी अशा धारणेचे हे भिकारचोट अवलादी...

गावातल्या म्हारड्यातनं कोरोना होईल म्हणून सगळ्यांना सतर्कतेचा एकीकडे इशारा देतात... तर झाडून पुण्याचं वऱ्हाड येत काय, काळजी न घेता,सुरक्षतेला फाटयावरच मारून जातात काय...

तेंव्हा या गावकऱ्यांचे डोळे फुटतात काय...?

गावात नासकी प्रवृत्ती उदयाला घालू पाहणाऱ्या त्या जातियवादी विचारांचा जाहिर निषेध...

एका बापाचीच जर औलादी असतील...फक्त जातिवाद उघड उघड करुन दाखवा... तुमचं नासकं बियाणं शोधलं तरी सापडू देणार नाही...

ज्यांनी अन्नापाण्याला लावलं, त्यांच्यात ताटात जर माती टाकण्याचं धैर्य करत असाल तर... याद राखा...

कदापि खपवून घेतलं जाणार नाही... परिणाम पाहायचे असतील तर एकदा भिडून बघाच...

भावकीतली, समाजातली अडाणी चार दोन फुस लावून फोडली म्हणजे मोठ्ठा तीर मारला काय?

सजग, सुशिक्षित समाजातली मोठी फळी आता सज्ज झालीय... जाती विरहीत समाजरचनेसाठी, पुर्नबांधणीसाठी, रॉयल रत्नापूर स्थापनेसाठी...
.
तुमचे कुटिल कारस्थान शेवटी कब्रस्थान दाखविल्याशिवाय राहणार नाही...

नडायला...भिडायला... तोडायला तुमच्यात ऐपत नाहीय... असेल दम तर उघडपणे भिडा...

#OPEN_CHALLENGE

शब्दांकन: सुमित रवि सरवदे
               संस्थापक - अध्यक्ष
  👑 रॉयल 🦁 रत्नापूर 👑 व सरवदे सन्स

Thursday, March 19, 2020

दगडी देव

______🙏__दगड_🙏_________

जी माणसं दगडात देव शोधतात ना त्यांला माझा त्रिवार मुजरा...

माणसांत देव शोधण्याचा दळभद्रीपणा चुकूनही करू नका.

अरे ती दगडाला
आपण  आपलं दुःख,भावना,व्यथा, स्थिती, परिस्थिती, सारं सारं सांगू शकतो... व्यक्त होऊ शकतो...

 मनातलं समदं वादळ शांत होऊन जातं... ते त्या मुर्तीवरच्या स्मितहास्यानं...

आपणचं रिबूट, रिफ्रेश करून नव्याने जीवन रिस्टार्ट करू लागतो.

ती दगडी मुर्ती आता आपलं व्यक्त होण्याचं हक्काचं माद्यम बनून जाते... आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जाते.

मांडतो कधी गाऱ्हाणं...
कधी सुख-दुःखांचा साधतो संवाद...

आनंदाची बातमी असल्यावर तर नकळत घेऊनच येतो निवद...

वाटोळे झाल्यावर डोके स्वतःचं त्याच दगडापुढं फोडतो...
तर चांगलं झाल्यावर कधी नारळही फोडतो...

कितीदा तरी आम्ही आमच्या भिकारपणाला, दरिद्रीपणाला आम्ही त्या मुर्त्यांनाच जबाबदार धरलेय...

आनंदाचे,ऐश्वर्याचे,भरभराटीचे दिवस आल्यावर मनोभावे ही पुजलेय...

जगाने बेदखल केलेली मने याच दगडी मुर्त्यांपुढे नतमस्तक होतात.

का तर ... इथं प्रत्येकाचीच गाडी ही दे धक्का स्वरूपाची आहे.

कोलमडून पडल्यावर...
वादळात सापडल्यावर...
माणसं सोडून गेल्यावर...
पूर्णतः हरल्यावर...
कोणीच नसल्यावर...
तर कधी एकटं पडल्यावर...

उरातल्या साचलेल्या तुफानाला पेलणं मुश्किल झाल्यावर...
तर कधी,
विरहाचे मेघ दाटल्यावर...

आमचा तारणहार, भाग्यविधाता, सुखकर्ता-दुखहर्ता हाच दगड बनून जातो.

माणसानं माणसाला माणसासारखं माणूसकीनं जगणं अपेक्षीत असताना...

 कांही लोक आत्मिक सुखाचा,स्वार्थाचा विचार करतात.

आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी मग बलाचा उपयोग करतात...

वरकरणी जरी ते सामर्थ्यवान,बलवान दिसत असले तरी मानसिकदृष्टया अशी अघोरी,विकारी,विषारी माणसं ही अंतःकरणातून खुपच हतबल, असाह्य झालेली असतात...

त्यांना आमच्या सोशिकता,सहनशिलतेमागचं यमक आणि गमक अजून पावेतो सापडलेलं नाहीय...

आमच्या अंधारमय जीवनात आशेचा किरण... आणणाऱ्या त्या दगडाला आम्ही याचे श्रेय केंव्हाच तर देऊन टाकलंय...

आम्हालाही कळतंय, दगड हा बोलत नाही...

पण बरंय ना तो तुमच्यासारखं बोलून अपमान करत नाही,

भावा-भावात,
गावा-गावात,
राष्ट्र- राष्ट्रात,
मना-मनात
भांडणं तरी लावत नाही...

तो आमचं ऐकून घेतो...
तो आम्हाला समजून घेतो...
आम्हाला मायेनं जवळ घेतो...
मनातली सारी आढी सरळ करतो....

त्याला ओवी गाणाराही प्यारा...
त्याला शिवी देणाराही प्यारा...
तोच व्यापलाय वाटतं विश्वात सारा...

एवढासा दगड तुमच्या अठरापगड जातीच्या उरावर मांडावासा वाटतोय...

माणसाला गोचिडासारखी चिटकलेल्या जातीला याच दगडाने ठेचावं वाटतंय...

तुम्ही आम्हाला वाळीत नसतं टाकलं...
समजून जर असतं ना घेतलं...
तर आज या दगडाला तुमचा बाप आम्ही केलंच नसतं...

आम्ही आता आमच्या सोईनुसार या दगडाला रुपं दिली आहेत...

दगडागणिक नावंही आता खुप दिली आहेत...

माणसा-माणसात जेंव्हा जेंव्हा भेद होतो...
प्रत्येक गटातटात,जन-समुहात नवा उद्वेग होतो...


बोलणाऱ्या माणसाने लुबाडल्याने, पुरतां उध्वस्त केल्याने...
आम्ही आता आमचं प्रतिनिधित्व दगडाला देतो आहोत...

आता तोच आमुचा हवाला,
रखवाला...
सबका मालिक,
ईश्वर,
परमेश्वर,
देव,
भगवान...

त्याच्याकडे उशिराने का होईना न्याय नक्कीच मिळेल याची शाश्वती दिलीय त्यानेच आम्हाला...


या दगडाने आम्हाला हळवे केलेय... आमचा श्वास -विश्वास-आस आता याच दगडात आहे.

याच दगडाने दिलीय जीवन जगण्याची शक्ती...
म्हणून कारणे आमची आहे या दगडावर भक्ती...

हवं तर मला मारा, कापा, जीवंत जाळा...
परंतू त्या दगडाला हात लावाल तर खबरदार....

चिंधडया... चिंधड्या करून टाकेन.

कारण
बरीच माझ्यासारखी समदुःखी,
समविचारी भक्तगण आहेत...

जी याच दगडाच्या भरवशावर तुमचा अन्याय गप्पगुमान सहन करत आहेत...

जीवण पाण्याचा बुडबुडा...
रिकामं आलो... रिकामंच जाणार...
मुठभर स्वार्थासाठी ...
मुठी आवळणाऱ्यांनो...

आमचं वैभव-साम्राज्य सर्वकांही घ्या...
आम्हाला भणंग भिकारी करा...

आम्ही सर्वत्याग करू, स्वार्थत्याग करू...

परंतु ज्या दगडाने आम्हाला माणूस केलंय ना...
त्याच दगडाने आमुची माथी नका भडकवू...
तुमच्या खुर्चीसाठी...
सत्तेसाठी...
राजकारणासाठी...

ठेवूनी मंदिरी दगड,
कांहींनी कमविला पैसा अडका रग्गड...

आम्हाला मात्र मुळ अस्सल दगड शोधायचाय...

जो पुर्वांपार, पिढ्यांन पिढया आमुच्या बापजादयांनी पुरुन ठेवलाय म्हणं...

दगडाच्या मुळावर उठलेल्या लोकांच्या भितीने...

आम्हाला जोपर्यंत तो मुळ दगड सापडत नाहीय ना...

तोपर्यंत थातूरमातूर,
शेंदूर फासलेल्या तुमच्या खरकाट्या दगडालाच नाविलाजाने पुजूबिजू... आम्ही...

आमुचा मुळ-पुरुषाचा परिसस्पर्श त्या दगडाला लाभलाय...

तोच दगड आमुचे आणि दुरीतांचे तिमीर जाऊन जीवनाचे सोने करील...

तो दगड ज्यांना कुणाला आजवर सापडला....
 ते ते साधू संत झाले, समाजसुधारक झाले, महापुरुष झाले, तथागत भगवानही झाले...

आपण सर्व एक आहोत,
सर्वाचा बाप एकच आहे...

असं कांही म्हणायचे खरंय,
पण आम्ही तो बाप शोधण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत...

दगड ना दगड... शोधतो आहोत...
दिंडी-दिंडीने...
पिढी-पिढीने...
बारी-बारीने...
वारी-वारीने...

©शब्दांकन -सुमित रवी सरवदे.
                 रत्नापूर,ता.परंडा,जि. उस्मानाबाद.
____________________🙏_____________
आपली मार्गदर्शक,प्रतिसात्मक, सुधारणात्मक प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...