कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शारीरिक शक्तीबरोबरच मानसिक शक्तीचीही तेवढीच, किंबहुना अधिक गरज असते. ही ताकद म्हणजे श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेली 'तितिक्षा' आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत उल्लेखिलेली 'सहनसिद्धी'; याच सिद्धीच्या बळावर लोकमान्य टिळक असंख्य अडचणींना सामोरे जाऊ शकले.
तुमच्या एका गालावर थप्पड बसली, तर दुसरा गाल पुढे करा... ही येशूची भूमिका शामळू शांततेची नाही. थप्पड म्हणजे कसोटीचा प्रसंग, आपत्ती, संकट!... आणि एका गालावरचा आघात घेऊनही दुसरा गाल पुढे करणं म्हणजे, I can stand it...
लोकमान्यांच्या 'तितिक्षे'चं एक प्रमुख साधन होतं, भगवद्गीता! त्यांचे जवळचे सहकारी दादासाहेब खापर्डे लिहितात, 'भांबवण्यासारखा प्रसंग प्राप्त झाला, की तात्काळ लोकमान्यांना कोणत्या तरी गीतावचनाची आठवण होत असे आणि त्या वचनाच्या अर्थाला ते आपलं मन असं करकचून बांधत की त्यास (त्या मनाला) भांबावताच येऊ नये.' दादासाहेबांचंही कौतुक वाटतं, आपल्या नेत्याचं किती बारकाईने निरीक्षण केलं होतं त्यांनी!
'तितिक्षे'साठी लागणारं पहिलं विचारसूत्र आहे- 'ध्येयाबद्दलची पक्की बांधिलकी! टिळकांचा लोकसेवेचा आणि देशसेवेचा वसा, त्यांच्या निरीक्षण-अनुभव-चिंतनातून आला होता. त्यात भर पडली असणार, त्या काळातल्या ज्येष्ठांबरोबरच्या चर्चांची आणि आगरकरांबरोबरच्या दोस्तान्याची! ह्या दोघांची ओळख आणि मैत्री झाली १८७९ मध्ये. पुढे दोघे जण एकत्र तुरुंगात होते, तेव्हा आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगवासातल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. व्यापक उद्दिष्टाचा स्वीकार आणि त्यातील ऊर्जा कायम ठेवणं किती कठीण. पण हे दोघे मित्र सतत ऊर्जेची देवाणघेवाण करत ध्येयनिष्ठा टिकवून ठेवत. आगरकर लिहितात, 'मी(आगरकर) एम. ए. करिता व टिळक एल.एल.बी. करिता अभ्यास करण्यासाठी कॉलेजात राहिलो असता, सरकारी नौकरी न पत्करिंता देशसेवेत आयुष्य घालवण्याचा ज्या दिवशी निश्चय केला, त्या दिवसापासून आम्ही जे जे बोललो-चाललो होतो त्याची पुन: पुन: आठवण होऊन अनेक वेळा पुनरावृत्ती होत असे.' हा उतारा साकल्याने एवढ्यासाठी दिला की तितिक्षेसाठी फक्त उद्दिष्ट सापडून चालत नाही. त्याचा जाणता आणि जागता जप सतत करावा लागतो आणि समध्येयी मित्रांचा सहवासही महत्त्वाचा असतो.
ध्येयांचा खुंटा बळकट झाला की पुढचा गुणधर्म आहे 'डोळस साहस'! हे साहसही स्वार्थी नाही. त्यामध्ये समाजाबद्दलची करुणा आहे. १८९६ साली मोठा दुष्काळ पडतो. दुष्काळ निवारणाचा कायदा म्हणजे 'फॅमिन कोड' लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणून टिळक लिहिलेला शब्द आणि वाणी इतकी कामी आणतात, की सरकारवरही त्यामुळे प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य तो दबाव यावा.
पुढच्याच वर्षी येते प्लेगची साथ. भर पडते रँडसाहेबाच्या दहशतीची. पुण्याच्या प्रत्येक वस्तीत टिळक जागृती सभा घेतात. शरीरविक्रय करणाऱ्या वस्त्यांनाही ते वगळत नाहीत. 'टिळकांच्या सभेला वेश्या' अशा मथळ्याची बातमी येते, तेव्हा ते म्हणतात, 'का? त्या स्त्रियासुद्धा माणूस आहेत ना! प्लेग पाहणार आहे का संसर्गापूर्वी?'
त्या काळामध्ये लोकमान्य स्वयंसेवकांना संघटित करण्याचे प्रयत्न करतात. तेव्हा त्यांनाही विफलतेचे क्षण अनुभवाला येतात. 'काँग्रेसचा एखादा कार्यक्रम ठरला वा एखाद्या नेत्याचे भाषण ठरले, तर आमचे स्वयंसेवक लगेच पुढे येतात; कारण तिथे मिरवायला मिळते, मौज पाहायला मिळते. प्लेगमध्ये काबाडकष्ट करून त्यांना काय मिळणार आहे.' पण अशा क्षणांना लोकमान्य कधी शरण जात नाहीत.
त्याच वर्षाच्या अखेरीला त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली पहिली शिक्षा होते. म्हणजे समाजकार्यासोबत राजकारणही सुरू असते. ६ सप्टेंबर १८९८ ला जेव्हा ते सुटतात, तेव्हा त्यांच्या वजनात बऱ्यापैकी घट झालेली असते. कारण शिक्षा असते ती, साधी नव्हे तर सक्तमजुरीची. असं असतानाही प्रत्येक तुरुंगवासाचा वापर ह्या गृहस्थांनी संशोधन, वाचन, लेखन ह्यासाठी केलेला दिसतो. सहनसिद्धीचा पुढचा गुणधर्म आहे- संकटाला सामोरं जातानाही जीवनाचं समग्रपण न विसरणं. जगण्यातल्या अनेक अंगांचा विचार करीत असताना त्या अंगांना एकमेकांशी जोडणं. टिळकांच्या लिखाणात कायदा, गणित, इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान असे सारेच विषय हातात हात घालून येतात. धकाधकीच्या जगण्यातही ज्ञाननिष्ठा न सोडणं हा नक्कीच 'सिद्धी'चा भाग. यामुळे जन्म घेतो दुर्दम्य आत्मविश्वास ज्याची मुळं शरीर-मेंदुच्या पेशीपेशीमध्ये मुरून जातात.
सत्यभामाबाईंना लिहिलेल्या एका पत्रात लोकमान्य लिहितात, 'आपण आणि दुर्दैव यांची टक्कर जुंपलेली आहे. त्यातून कोणीतरी एक हरणार व एक जिंकणार. अर्थात आपण हार न जाण्याचा निश्चय केला तर आपणच जिंकू!'
'…उन्हाळ्यात मंडालेचा तुरुंग म्हणजे लोहारकामाची तापलेली जणू भट्टीच असे. त्यातच उन्हाळ्यातले वादळी वारे मातीचे थर अंगावर उभे करीत. हिवाळ्यात कमालीची आणि बोचणारी थंडी असे. लाकडी दरवाजे या थंडीपासून कुणाचंच संरक्षण करू शकत नसत. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि सूर्य तापलेला. पाण्यात भिजवलेला टॉवेल जर अंगाभोवती गुंडाळला तर काही मिनिटांतच कोरडा होत असे. आमच्यापैकी एकही जण मोठ्या आजारातून गेल्याशिवाय राहिलेला नाही. अशा परिस्थितीत लोकमान्यांनी बौद्धिक लिखाणाकडे लक्ष दिलं, हे अपूर्वच!'
दिनांक १ ऑगस्ट १९४४ ला आझाद हिंद नभोवाणीवरून नेताजी सुभाषचंद्र बोसांनी लोकमान्यांना वाहिलेली ही आदरांजली. टिळक निवर्तल्यानंतर काही वर्षांतच, देशद्रोहाच्याच आरोपाखाली सुभाषबाबू मंडालेमध्येच होते. एखाद्या मंदिराचं दर्शन घ्यावं, तसं त्यांनी लोकमान्यांच्या त्या कोठडीचं दर्शन घेतलं होतं... एका जबरदस्त 'तितिक्षा' तज्ञाने केलेलं दुसऱ्याचं गौरव-वर्णन!
त्यातला गुणधर्म हा आहे, की सहनसिद्ध व्यक्ती, त्या त्या वेळच्या कर्तव्यावर, कामावर जेव्हा लक्ष केंद्रित करते, तेव्हा सभोवतालचं पर्यावरण, व्यावहारिक परिस्थिती, अडचणी ह्या साऱ्यांपासून स्वतःचं मन अलिप्त करू शकते. त्यासाठी लागतो तो निर्धार, म्हणजे Determination ही भावना. असं झालं की प्रत्येक प्रसंगात मन स्थिर राहू लागतं.
मंडालेला असताना लोकमान्यांनी एका बाजूला 'गीतारहस्य' ह्या ग्रंथाच्या लेखनाला हात घातला; तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या शिक्षेच्या संदर्भातलं अपील थेट इग्लंडमध्ये पोहोचलं होतं. ती कायदेशीर लढाई सुरू होतीच. त्या संदर्भातल्या १३ फेब्रुवारी १९०९ च्या पत्रामध्ये लोकमान्य लिहितात- 'अंतिम सुनावणीची तारही थेट लंडनहून पाठवा. माझा तारेचा पत्ता अगदी थोडकाच आहे. 'टिळक, जेल, मंडाले' जेलच्या आधी सेंट्रल म्हणायची आवश्यकता नाही. कारण दुसरा तुरुंग येथे नाहीच. त्यामुळे तुमचा एक शब्द वाचेल. एका शब्दाला तीन रुपये पडतात. पत्ता फक्त तीन शब्दांत लिहावा.'
तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात विहरत असतानाही टिळक व्यवहाराला विसरत नाहीत. पुढे प्रत्यक्ष तारेच्या मजकुराचेही ते तीन 'खर्डे' (Drafts) सांगतात- 'ॲडमिटेड, गव्हर्नमेंट नॉट अपोझिंग' हा पहिला. दुसरा आहे 'ॲडमिटेड इनस्पाईट ऑफ अपोझिशन' आणि 'डिसमिस्ड' हा तिसरा. ब्रिटिश सरकारने टिळकांचे तारेचे पैसे कमीत कमी खर्च होतील असं पाहिलं.
'तितिक्षे'च्या साधकाचं मन कधीच नाही का विव्हल होत? होतं ना... मंडालेला असताना टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई गेल्या. तो दिवस ७ जून १९१२. टिळकांवर झालेला 'आघात' आणि झालेले 'क्लेश' त्यांनी पत्रात लिहिले आहेत. आघात आणि क्लेश हे त्यांनीच लिहिलेले शब्द... पण स्वयंशिस्त अशी जबरदस्त, की त्यातूनच भावनिक नियमन येत असावं. टिळकांना दुःख झालं, पण ते त्यात अडकले नाहीत. दुःख पचवणे हे सहनसिद्धीचंच लक्षण!
१९०३ साली टिळकांना पुत्रशोक झाला. त्यावेळची एक हकीकत त्यांचे लेखनिक आ. वि. कुळकर्णी ह्यांनी सांगितली आहे. टिळकांकडून अग्रलेखाचं टिपण लिहून घेण्यासाठी ते खोलीचं दार वाजवतात. तसे टिळक सवयीने 'विश्वनाथ' अशी हाक मारतात. क्षणात त्या पित्याचं हृदय विद्ध होतं, पण ते उठून कडी काढतात. कुळकर्णी लिहितात- 'दुःखाचा आलेला उमाळा त्यांनी ताबडतोब कसा गिळून टाकला, हे त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होते.' भावनिक नियमनाशिवाय तितिक्षा अशक्य!
टिळक म्हटलं, की आपल्याला त्यांची सुपारीची सवय आठवते. मंडालेहून परत आल्यावर एका मुलाखतीत त्यांना विचारलं, की मंडालेत सुपारीशिवाय कसं चाललं? टिळक म्हणतात, 'सुपारी म्हणजे काही ऑक्सिजन नव्हे, की ज्यावाचून माणसाला जगणं अशक्य आहे.' कसोटीच्या काळात अनेक 'अभावांना' सामोरं जावं लागतं. त्याकडे पाहायचा दृष्टिकोन ठरवावा लागतो.
आपल्या असं लक्षात येतं टिळकचरित्राचा अभ्यास करताना, की ह्या माणसाने सहनसिद्धीसाठी कठोर साधना केली असणार. बालपणातले आणि तरुणपणातले टिळक चंचल आणि व्रात्यही दिसतात. कॉलेजमध्ये त्यांना 'ब्लंट' किंवा 'डेविल' अशी टोपणनावंही होती. म्हणजे मुळात काहीसा उतावळा स्वभाव असतानाही ते 'साधक' झाले. अहो, किती आव्हानं पेलली असतील ह्या माणसाने आयुष्यात? मंडालेत असताना त्यांना मधुमेह हा सोबती होताच. सोबत हायड्रोसील, पचनविकार आणि हिरड्यांचा त्रास. पण ह्या साऱ्या विकारांसह ह्या माणसाने आपली साधना अखंड सुरू ठेवली. म्हणून बुलंद कणखरपणा, अर्थात Resilience शिकावा तर लोकमान्यांकडून!
आपण मोठ्या गौरवाने टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' अर्थात 'Father of Indian Unrest' असं म्हणतो. पण हा उल्लेख प्रथम केला व्हॅलेंटाईन चिरोल ह्या गृहस्थांनी. तोही संपूर्णपणे नकारात्मक पद्धतीने. ह्या चिरोलसाहेबावर टिळकांनी केलेल्या, नुकसानीच्या खटल्याच्या संदर्भात टिळक इग्लंडमध्ये गेले आणि तो खटला शेवटी हरले.
ह्या खटल्याच्या निकालानंतर टिळकांनी दा. वि. गोखल्यांना लिहिलेले एक पत्र आपल्या साऱ्यांना ज्ञात आहे. कोणत्याही आपत्तीकाळाला सामोरे जाताना, आपली वृत्ती कशी हवी हे टिळक सांगताहेत. हा आहे तितिक्षेचा परमोच्च बिंदू... ज्ञानेश्वरांना त्यांचा 'सहनसिद्ध' लोकमान्यांमध्ये सापडला.
'केसचा निकाल अनपेक्षित लागल्याने मी खचून गेलो असेन, ही समजूत पूर्णपणे निराधार आहे. माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळले, तरी निराश न होता माझ्या उद्दिष्टांसाठी मी त्या कोसळलेल्या आकाशाचा उपयोग करेन. असेल त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले पाहिजे. परिस्थितीला आपल्यावर सत्ता गाजवू देता कामा नये. आजवरच्या माझ्या कामाचे वैशिष्ट्य हेच आहे…'
लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षामध्ये त्यांच्याकडून आलेला तितिक्षेचा वारसा, सखोल गिरवण्यासाठी खरंतर आपल्यासमोर एक 'नामी संधी' येऊन उभी ठाकली आहे!