सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आजही म्युच्युअल फंड, शेअर्सपेक्षाही मुदत ठेवी, प्रॉव्हिडंट फंड, पोस्ट ऑफिस अशा सुरक्षित गुंतवणूक योजना आपल्याशा वाटतात. त्यातही पोस्टाच्या गुंतवणूक योजना अधिक लाभदायी ठरतात. छोटे गुंतवणूकदार तसंच आपल्या बचतीवर निश्चित उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा असणार्यांना पोस्टाच्या विविध योजना आकर्षित करतात. पोस्टाच्या प्रत्येक योजनेचा कालवधी, नियम, व्याजदर वेगळे असल्यामुळे आपल्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार योजनांची निवड करायला हवी. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे पोस्ट ऑफिस योजनांवरचा व्याजदर केंद्र सरकार ठरवतं. शिवाय या व्याजदारांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातात.
पोस्टाच्या अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बराच मोठा निधी जमा करू शकता. पोस्टाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पीपीएफसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बरेच लाभ मिळवू शकता. या लेखात आपण पीपीएफबद्दल जाणून घेऊ. पोस्टाच्या पीपीएफ खात्यात मासिक गुंतवणुकीची सोय आहे. यासोबतच 15 वर्षं पूर्ण झाल्यानंतर हे खातं पुढे सुरू ठेवता येतं. प्रत्येक वेळी पाच वर्षाचा कालावधी वाढवून घेता येतो. व्याजदरांमध्ये कोणताही बदल न झाल्यास पीपीएफ योजनेत दिवसाला 300 किंवा 400 रुपये गुंतवणूक करून अनुक्रमे 26.8 आणि 23.5 वर्षांमध्ये एक कोटी रुपये जमा होऊ शकतात.
समजा, तुम्ही पीपीएफ खात्यात दिवसाला 300 रुपये गुंतवणार असाल तर वर्षाला 1,09,500 रुपये गुंतवणूक होईल. या योजनेत वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या पोस्टाच्या पीपीएफवर वर्षाला 7.9 टक्के दराने व्याज मिळतं. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केल्यास साधारण 26.8 वर्षं एवढ्या कालावधीत तुमच्याकडे एक कोटी रुपये जमतील. मात्र हे खातं प्रत्येकी पाच वर्षं याप्रमाणे 15 वर्षं वाढवल्याने 30 वर्षं पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम काढता येईल. त्याचप्रमाणे दिवसाला 400 रुपये गुंतवणार असाल तर वर्षाला एक लाख 46 हजार रुपये गुंतवणूक होईल. 7.9 टक्के व्याजदरानुसार 23.5 वर्षांमध्ये एक कोटी रुपये निधी जमेल. हे खातं दहा वर्षांसाठी वाढवण्यात आल्याने 25 वर्षं पूर्ण झाल्यानंतर खात्यातली रक्कम काढता येईल. पोस्टाच्या पीपीएफवर चक्रवाढ व्याजाचे लाभ मिळतात.
संपूर्ण वर्षाची रक्कम एकत्रित गुंतवणार्या गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला पैसे गुंतवल्यास अधिक लाभ मिळू शकतात.
No comments:
Post a Comment