गुंतवणूक : कशी करावी ? कुठे करावी ?
उत्तम व्यवहाराद्वारे जोडलेले धन तसेच ठेवण्यात काय अर्थ आहे? ते वाढवायलाही हवे. वाढत्या गरजा, महागाई आणि भविष्याचा विचार करता आपल्या धनात वृद्धी होणे ही खरोखरच गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. आपल्याला जमेल तसे जमतील तितके पैसे गुंतवले पाहिजेत, बचत केलीच पाहिजे.रसाळ आंब्यांनी लगडलेली आमराई अस्तित्वात येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यासाठी योग्य नियोजन, चांगली रोपे, मशागत आणि निगराणी अशा अनेक गोष्टींची गरज असते. मेहनतीबरोबरीने चांगल्या हवामानाचीही साथ लागते. गुंतवणुकीचेही थोडेसे असेच असते. अपेक्षित लाभ मिळण्यासाठी आर्थिक नियोजन आणि त्याप्रमाणे शिस्तशीर कार्यवाही यांची आवश्यकता असते. योग्य तऱ्हेने गुंतवणूक केल्यास हाती असलेल्या शिलकी रकमेतूनही आपल्याला हवी तशी रक्कम जमवता येणे शक्य होऊ शकते. त्यासाठी काही तत्त्वे मात्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.1. लवकर सुरवात : गुंतवणुकीला जेवढी लवकर सुरवात करू तेवढा त्यावरचा लाभ अधिक मिळत जातो. वयाच्या 25 व्या वर्षी सुरू केलेली बचत वयाच्या 30व्या वर्षी सुरू केलेल्या अधिक रकमेच्या बचतीपेक्षा जास्त होते. कारण गुंतवणूक जास्त काळ होते.2. चक्रवाढ व्याजाची करामत : लवकर बचत सुरू केल्यामुळे फायदा होण्याचे मुख्य कारण म्हणजे चक्रवाढ व्याज- व्याजावर व्याज मिळत जाते. त्यामुळे अधिक फायदा होतो. 30व्या वर्षी 1 लाख रुपये गुंतवले तर 60 व्या वर्षी (10% दराने) 17.45 लाख होतात तर 50व्या वर्षी 5 लाख रुपये त्याच दराने गुंतवल्यास 60व्या वर्षी फक्त 13 लाख होतात.3. नियमित गुंतवणूक : दर महिना सातत्याने गुंतवणूक केल्यास मिळणारा फायदा लक्षणीय असतो. एक हजार रुपये 30 वर्षे 10% व्याजदराने गुंतवल्यास मिळणारी रक्कम 22 लाख होते. थोडक्यात लहान रक्कम दीर्घ काळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्चित आहे.गुंतवणूक कशात करावी?महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा हवा असेल तर पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनात करून लाभदायी ठरणार नाही. बँकेचे व्याजदर कमी झाले आहेत. पोस्टातील मासिक योजनेचा बोनस वाढला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीवर 8%पेक्षा अधिक व्याजदर मिळू शकत नाही. गेल्या सहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर मिळालेला वार्षिक सरासरी परतावा असा आहे,सोने : 9 -11%बॅंक मुदत ठेव : 7 - 8%बीएसई सेन्सेक्स : 15 - 17% (इक्विटी शेअर्स)महागाई दर : 7 - 8 %इक्विटी शेअर्समधल्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा सर्वाधिक आहे आणि तसे करण्यात जोखीम अर्थातच आहे. पण ज्याला जास्त परतावा हवा आहे त्याला योग्य ते व जबाबदारीने धाडस करायलाच हवे. यासाठी म्युच्युअल फंडाचा राजमार्ग खुला आहे. जोखीम व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करण्याची सोय इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये आहे. सर्वसामान्य माणूस 500 रुपये इतक्या कमी रकमेतून या योजनांत गुंतवणूक करू शकतो. त्यासाठी डिमॅट खाते लागत नाही. म्युच्युअल फंड व्यावसायिकरीत्या सर्वसामान्य जनतेचा पैसा जोखीम कमी करून भांडवल बाजारात गुंतवतात. ज्याचा लाभ गुंतवणूकदाराला मिळतो.भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. वाढत्या विकासदराचा फायदा येथील कंपन्यांना होणार व त्याचा लाभ ते त्यांच्या भागधारकांना देणार. आपण म्युच्युअल फंडाद्वारे या लाभात निश्चित सहभागी होऊ शकतो. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (बॅंकेतल्या मासिक ठेव योजनेसारखे) सहभागी होऊन लवकरात लवकर इक्विटी म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करावी. त्या दीर्घ काळाचा विचार करावा. शेअर्सच्या बाजारभावातल्या वाढ-घटीने विचलित होऊ नये. कारण लक्षात ठेवा, "इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे तसेच न करणेही जोखमीचे आहे.'
No comments:
Post a Comment