पोस्टातील बचत खात्यावरील विविध सेवाशुल्क
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 05 Feb 2020, 01:50:00 PM
टपाल विभाग (पोस्ट) हा सर्वसामान्य जनतेला नियमित बचतीची सवय लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त विभाग आहे. पोस्टामध्ये कमीतकमी बचतही करता येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील व्यक्तीही पोस्टाच्या माध्यमातून भविष्याची तरतूद करू शकते.
टपाल विभागामध्ये (पोस्टामध्ये) तुमचे अल्पबचत खाते असेल तर त्याचा वापर तुम्ही नियमित करत असाल तर त्यापासून मिळणाऱ्या सेवा घेताना पोस्ट विभाग कोणकोणते शुल्क लावते हे जाणून घेणे गरजेचे आहे. नवी धनादेश पुस्तिका (चेकबुक) हवी असल्यास, खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करायचे असल्यास, खात्यातील व्यवहारांचे पत्रक हवे असल्यास तुम्हाला पोस्टाकडून काहीएक शुल्क आकारणी केली जाते. अल्पबचत खात्यांमध्ये पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, मासिक आय योजना, राष्ट्रीय बचतप्रमाणपत्र अशा प्रकारची खाती येतात.
तक्त्यामध्ये दिलेल्या सेवांखेरीज ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र (केव्हीपी), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) यांचाही समावेश पोस्टाच्या बचत योजनांमध्ये होतो.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने १३ मे २०१६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १ जुलै २०१६ पासून केव्हीपी आणि एनएससी यापुढे छापील प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिली जाणार नाहीत. त्याऐवजी ही दोन्ही बचत प्रमाणपत्रे ई-स्वरूपात किंवा पासबुक स्वरूपात दिली जातील. त्यानुसार सध्या आपल्याला ही दोन्ही बचत प्रमाणपत्रे बव्हंशी पासबुक स्वरूपात मिळत आहेत. समजा तुमच्याजवळ असलेले एनएससी प्रमाणपत्र गदहाळ झाले किंवा जीर्ण झाले तर तुम्हाला ते नव्याने करून घ्यावे लागते. असे करताना ते पासबुक स्वरूपातच मिळते व त्यासाठी प्रति प्रमाणपत्र १० रुपये सेवाशुल्क लागू होते.
त्याचप्रमाणे तुमचे पोस्ट ऑफिस बचत खाते असेल आणि तुम्हाला १० धनादेशांपेक्षा (चेक) अधिक धनादेश असलेली पुस्तिका (चेकबुक) हवे असल्यास प्रत्येक अतिरिक्त चेकसाठी तुम्हाला दोन रुपये मोजावे लागतात.
पोस्टाच्या विविध सेवांवर द्याव्या लागणाऱ्या शुल्कांची माहिती आपण घेतली. पोस्टाकडून आपल्याला कोणकोणत्या सेवा मिळू शकतात याची माहिती आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. पोस्टाने सध्या कात टाकली असून, एका शाखेत उघडलेल्या बचत खात्याचा वापर आता देशभरातून करणेही शक्य झाले आहे. इंटरनेट आधारित सेवा, पोस्टल बँक, एटीएम अशा सेवाही पोस्ट देत आहे. या सर्वांचा लाभ आपण घ्यायला हवा.
पोस्टाच्या अल्पबचत खात्यावर लावण्यात येणारे विविध शुल्क
विविध सेवा सेवाशुल्क (रु.)
डुप्लिकेट पासबुक देणे ५०
खाते व्यवहार पत्रक देणे २० प्रत्येकी
डिपॉझिट पावती देणे २० प्रत्येकी
पासबुक हरवले किंवा जीर्ण झाल्यास नवे देणे १०
नाव रद्द करणे किंवा नॉमिनी बदलणे ५०
खाते हस्तांतरित करणे १००
प्लेजिंग १००
बँक बचत खात्यासाठी चेकबुक देणे १० चेकपर्यंत शुल्क नाही. त्यापुढे प्रतिचेक २ रुपये
न वटलेला धनादेश असल्यास १००
No comments:
Post a Comment