पायाखाली | मिसळपाव
ज्या काळात कोमट्यांच्या घरांत ब्राह्मण भाडेकरूच चालायचे, लिंगायतांच्या घरांत जंगम भाडेकरूच चालायचे, त्या काळात बाबूराव खंदारेंचा वाडा प्रचंड कॉस्मोपॉलिटन म्हणायला हवा. एक बाजूला कौलारू शेडमधे लिंगायत बाबूराव आणि त्यांच्या सप्तकन्या यांचे कुटुंब. दुसर्या बाजूला काँक्रीटच्या छताखाली चार वेगवेगळी कुटुंबे. एका छोटेखानी खोलीत आमचे ब्राह्मण कुटुंब, आमच्या मागे थोड्या लांब खोलीत वारकाचे बालाजीमामा, त्यांच्याशेजारी यलमाच्या जिंदगानीचे दोन खोल्यांचे कुटुंब. भाडे वाढले तसे त्यांनी एकच खोली ठेवली आणि त्यांच्यापुढे थोडे भिडस्त मराठे कुटुंब राहायला आले. ते मराठे नसून महार आहेत अशी यलमांकडे कूजबूज चालायची पण बाबूरांवांनी त्यात कधी लक्ष घातले नाही. त्यांच्या बाजूला, थोड्या मागच्या दिशेने, म्हशींची पत्र्यांची शेड होती आणि ५-७ म्हशी त्यात रवंथ करत पडलेल्या असत. पलिकडे परसाकडला जाताना म्हशींच्या शेपटीचा झपकारा वाचवत वाचवत अंग चोरुन जावे लागायचे आणि ती जागा आधीच कुणी काबीज केलेली आढळली कि त्याच पद्धतीने परत यायला लागायचे.
माझ्या त्या म्हशी, ते परस, तो उकिरडा धरून त्या प्रत्येक कुटुंबाबद्दल इतक्या आठवणी आहेत कि त्यातून एक कथाविस्फोट व्हावा. सध्याला मी तुम्हाला यलमाची जिंदगानी म्हणजे काय ते संक्षेपात सांगतो आणि मूळ विषयाकडे वळतो. तर तिच्याकडे वाड्यातला एकमात्र टेपरेकॉर्डर होता आणि त्यावर 'जिंदगी कि ना टूटे लडी' आणि 'जिंदगी प्यार का गीत है' ही आणि असली जिंदगीवाचक गाणी आळीपाळीने लागत राहायची. शिर्देवी तिची आवडती हिरोणी. तिच्या कोण्या चित्रपटात जिंदगानी शब्द वापरून एक डायलॉग होता जो यलमीणीच्या खूप जिव्हाळ्याचा होता. मी स्वतः वजा जाता माझी आई आणि ती अशा दोनच बाया, रादर व्यक्ति, वाड्यात तत्त्वज्ञान सांगायच्या पात्रतेच्या होत्या. आई 'माणसाच्या जीवनात ना...' असा ब्राह्मणी हेल काढी तर यलमीण 'जिंदगानी मदे ना,...' असे फिल्मी स्टाईलने म्हणे. मराठीत एव्हढा कृत्रिम वाटणारा शब्द ती इतक्या सहजतेने उच्चारी कि मग माझ्या भावाने तिचे नावच जे जिंदगानी ठेवले तेच सगळ्यांकडून तिच्या अपरोक्ष वापरले जाऊ लागले आणि मूळ नाव काय आहे हे लक्षात ठेवायचा प्रश्नच मिटला. असो.
वाड्यात दुपारच्या वेळी सगळ्या बायका वसरीत एकत्र जेवत. सगळ्यांचे नवरे कामानिमित्त बाहेर गेलेले. मग हिची थोडी भाजी तिला, तिची कसलीशी चटणी तिसरीला असा लांबलचक प्रकार चाले. त्यात दीर्घ प्रदीर्घ चर्चा चालत आणि कुणाचा नवरा कसा आहे आणि कुणीच्याने काय केले याचा विषय निघे. गोष्ट शेवटी स्वतःच्याच अब्रूवर बूमरँग होणार नाही याची काळजी घेत प्रत्येक जण नवर्याचा कोडगेपणा सांगत असे. पण त्यांच्यात बालाजीमामा अत्यंत लाघवी, हसतमुख, न चिडणारे, न रागावणारे,प्रेमळ, समंजस अशा बिरुदांनीशी चर्चिले जात. एरवीही क्वचित जेव्हा पुरुष लोक एकत्र माळवदावर जेवायला बसत तेंव्हा सर्वांच्या तोंडी बालाजीमामांची भरभरून तारीफच असे. बालाजीमामा असे काही फार उदार आणि त्यागी नव्हते पण त्यांचे सामान्य असणेही फार कौतुकास्पद होते. आपले सामान्यत्व सामान्यपणे कॅरी करता आले तर माणूस एक विशेषत्व पावतो. त्याचे ते एक उदाहरण होते.
बालाजीमामांचे नविनच लग्न झाले होते आणि ते राहायला आलेच होते सपत्निक. नवरा बायको अत्यंत मर्यादाशील. चारचौघात कोणती लगट नाही. कोणास वाटणार नाही कि जोडपे नविन आहे. त्यांची राहणी साधी होती. भपका नाही. घाण नाही. कोणेते व्यसन नाही. शिवाय त्यांच्याकडे आमच्याप्रमाणे पैश्यांची वाणवा नावाचा प्रकार नव्हता. अण्णा म्हणत कि त्यांना अजून लेकरे झाली नसल्याने असे होते. बालाजीमामांचा माझ्यावर विशेष जिव्हाळा होता. त्यास कारण माझी प्रश्नप्रवृत्ती. कोणत्या माणसाला कोणते प्रश्न उडवून लावता येत नाहीत याचा माझा त्याकाळी सखोल अभ्यास होता. प्रश्नांतून संवाद उद्भवतो आणि त्याचा परिपाक दृढ नात्यात होतो. संवादामधे माणसे उलगडत जातात आणि जास्त सहज वाटत. मी तेव्हा ९ वी ते १२ वीला असेन आणि शांत, अबोल स्वभावाच्या बालाजीमामांना माझ्या बोलघेवड्या स्वभावाने मी जास्त सहज वाटलो असेन. आम्ही त्या घरात ४-५ वर्षे राहिले असू. ते ही तिथे तितकाच काळ जवळजवळ त्याच वेळी राहिले असावेत. बालाजीमामांचा भाऊ महादू सुद्धा त्यांच्यासोबत राहत असे. त्याचा इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा चालू होता. त्याचे आणि माझेही सूत भयंकर जमे. आमच्यासोबत तो नेहमी माळवदावर आणि पावसाच्या दिवसांत वसरीत झोपे. बालाजीमामांना सामाजिक, राजकीय विचार असे नव्हते; महादू मात्र उदगीरच्या किल्ल्यात वैगेरे फिरायला गेल्यावर मुस्लिम आक्रमकांपेक्षा इंग्रजांनी देशाचे जास्त नुकसान कसे केले, इ इ ते सांगे. त्याच्या डिप्लोमाचा अभ्यासक्रम आमच्या विज्ञानापेक्षा फार अवघड आहे असे सिद्ध करून देई. मैत्रिपूर्ण वातावरणात कोणाची अस्मिता अधिक उच्च आहे याची एक सुप्त स्पर्धा माझ्यात नि त्याच्यात चाले.
लाघवीपणात बालाजीमामाची बायको नवर्यापेक्षा सरस होती. उंच, गोर्यापान बालाजीमामांना पण ती दिसायला अत्यंत अनुरुप होती. ती आईसारखीच दिसे, वागे आणि तिचे नाव आणि माझ्या आईचे नाव एकच होते, म्हणून मी तिच्यात माझ्या आईला शोधायचा प्रयत्न करायचो. पण मी तिला ताई म्हणत असे. मला ती सख्ख्या बहिणीपेक्षा जवळची वाटे कारण मोठ्या बहिणीप्रमाणे ती माझी विचारपूस करे. ती सगळ्यांशी मिळूनमिसळून वागे. अडचणीच्या वेळी मदतीला धाऊन जाई. घरमालकाच्या कर्कश राजीप्रमाणे तिचे कोणाशीही भांडण होत नसे. माझ्या आईचीही साधी, भोळी, मनात कुणाबद्दल काही पाप नसणारी अशी वाड्यात सर्वात उजळ प्रतिमा होती. आईचा एक नैतिक (आणि जातीय) दराराच होता म्हणा. आईचे नि तिचे चांगलेच सूत जुळे. मी ताईकडे खूपदा जेवायला जायचो. मला जेऊ घालायला तिला खूप आवडायचे. ती देवभोळी असल्याने मला कितीतरी देवांच्या गोष्टी सांगत असे. तिच्याकडेही मी हजारो चांभारचौकश्या करत असे आणि त्यांना उत्तर देण्यात तिचा कितीतरी वेळ जाई. तिच्या माहेरचे मात्र कुणी तिच्याकडे फिरकताना आढळले नाही. तिला म्हणे तीन भाऊ होते पण त्या घरी कोणी आल्याचे आठवत नाही. आई, अण्णा, ताई, बालाजीमामा, मी, माझी बहीण यांचे सख्य नंतर फार वाढले आणि संध्याकाळी आपापल्या गंगाळं घेऊन एकत्र जेवायला जाणे चालू झाले. मी तेव्हा आठवी नववीला असेन, आईची आणि ताईची काहीतरी कुजबुज चालायची. मी अवतरलो कि दोघी गप्प व्हायच्या आणि विषय बदलायच्या. मला ते कळे नि मी लगेच 'काय, काय, काय म्हणत होतात तुम्ही?' म्हणून विचारे. अगोदर तर त्या 'कुठे काय? काही नै.' म्हणत. नंतर मात्र 'तुला काय करायचंय रे बायकांच्या गप्पांत पडून?' असं म्हणायला लागल्या. मला कुतुहल असे पण मी ते दाबून ठेवे.
ताई थोडी भित्रीच होती म्हणायला हरकत नाही. घरात कुठं काही खाडखूड झालं कि ती प्रचंड दचकत असे. खोलीत एकटेपणाची तिला भिती वाटत असावी. कदाचित म्हणूनही मी समोर असलेले तिला आवडत असावे. वाड्याच्या मागे, खरेतर आमच्या वाड्याच्या मागच्या वाड्यात मी छतावरून उडी मारून अभ्यास करायला बसत असे. ती जागा शांत होती आणि लिंबाची थंड सावली तिथे पडत असे. तिथे सापांचे एक वारुळ होते. तसे ते साप आपापल्या वाड्यात निमग्न राहत पण क्वचित कधीकधी मी नीट अभ्यास करत आहे का हे पाहण्यासाठी बाहेर डोकावत. वाड्यात एकदा साप निघाला होता. तो वारुळातूनच जिंदगानीच्या घरात घुसला असावा. तेव्हा ताईने दरवाजा आतून घट्ट लावून घेतला होता. साप मेला म्हणून कळलं तेव्हा ती त्याला बघायला आली आणि क्षणातच पुन्हा घरात जाऊन दार घट्ट लावून घेऊन बसली. झुरळ, पालीला ती घाबरत नसे पण अंधार, आवाज, साप, इ इ तिच्या भितींचा डोमेन विस्तीर्ण होता. राजीने एकदा तिला खोट्यानेच भूत म्हणून घाबरवले आणि तेव्हा ती जी पांढरी पडली ती राजीची पुन्हा तसे करायची हिंमत झाली नाही.
बालाजीमामांचा नि आमचा ऋणानुबंध इतका घट्ट बनला कि बालाजीमामांनी आम्हाला टाळता न येण्यासारखे सहकुटुंब त्यांच्यागावी दिवाळीला यायचे निमंत्रण दिलं. चांगला आठवड्याभरचा प्रोग्राम ठरला. अण्णा येऊ शकले नाहीत, त्यांना ऑफिसची कामं होती. एखाददिवस फिरकेन म्हणाले. बालाजीमामांनी आम्हा सर्वांचं टिकिट काढलं आणि आम्ही एसटीने वाढवणा खुर्दला दाखल झालो. वाढवणा बुद्रुक तिथून चालत तासाभरावर होते आणि तिथे बस जात नसे. रात्रीचा वेळ. बालाजीमामांनी हातात एक काठी घेतलेली आणि ती टणाटणा आपटात एका पाणाळ ओढ्यातून आम्ही चालू लागलो.
"चपला काढून हातात घ्या." मामा.
"पाय ठेचला तर?" मी.
"सगळा माताळ, रेताळ ओढा आहे. माझ्या पावलावर पाऊल ठेऊन चला. फक्त पाय तेव्हढा उचलून टाका." मामा.
"काटे मोडले तर?" पुन्हा मीच.
"..."
"आणि साप चावला तर?" मी.
"शुभ बोल रे मेल्या." आई कातावली होती.
"मी आणि आमच्या गावचे सगळे लोक नेहमी असेच येतात. कधी कोणाचा पाय ठेचला नाही, काटा मोडला नाही कि साप चावला नाही. मला सगळा रस्ता मुख्पाठ आहे! तुम्ही फक्त माझ्यामागे नीट चाला."
मी शंभर शंका काढत असलो तरी जोशी कुटुंबीय बिनधास्त होतो. देव आपल्यासारख्या सज्जन लोकांना काही करत नाही यावर आमचा ओव्हरकाँफिडन्स होता. लवकरच ओढ्याच्या किनार्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांच्या फांद्या परस्परांस मिळाल्या नि चंद्रकला अधूनमधून आमच्यावर लूकलूकू लागली अन्यथा सगळा अंधार. बालाजीमामांनी बॅटरी काढली, ती कधी मागे तर कधी पुढे मारत आमची चमू पुढे नेऊ लागले. सौंदर्यदृष्टीसंपन्न नसल्याने इतर सगळे माझ्याप्रमाणे त्या अद्भुत अनुभवाचा आनंद घेऊ शकत नव्हते म्हणून ते साधेच चालत होते. माझे काही काही रम्य उद्गार वेल रिसिव झाले नाहीत. तितक्यात जाणवले कि नवर्याच्या पाठोपाठ असलेली ताई बर्याच मागच्या क्रमांकावर, सर्वांच्या मधे, आली होती. बालाजीमामांनी तिला पुढे बोलावून घेतले आणि जीवाचा आटापिटा करून ती पुन्हा तिथे दुसर्या क्रमांकावर गेली आणि चालू लागली. काही किडूक मिडूक आलं तर आपण या लोकांना घेऊन आलो आहोत म्हणून सर्वात अगोदर आपल्यावर आलं पाहिजे या बालाजीमामांचा स्पिरीट तितकासा शेअर करत नाहीय याची अल्पशी जाणिव माझ्या महाहिशेबी मनाला तेव्हा झाली.
लवकरच बालाजीमामांचे गाव आले नि त्यांच्या घरात प्रवेश करते झालो. नव्या प्रथेप्रमाणे त्यांचे मूळ महामोठे घर काका आणि वडील यांनी मधातून खिळा पाडून अर्धे अर्धे वाटून घेतले होते. खालच्या बाजूला तीन खोल्या. वरच्या बाजूला कडब्याची, धतुर्याच्या फोकांची एक खोली. तिच्यात जायला कोणत्याही पायर्या नकोत. एक प्रचंड मोठे वडाचे झाड खोल्यांना खेटूनच होते. चक्क त्यावर पाय ठेऊन, चढून वर जावे लागे. म्हणून तिथे वयस्क स्त्रीयांचा त्रास नसे. अंगणात नहाणी आणि फुलाभाज्यांची बाग. दूर एका कोपर्यात केशकर्तनालय, म्हणजे साधी केस कापायला ठेवलेली जागा. कोणतीही नावाची पाटी नसलेले. सगळ्यांना माहित हा वारकाचा वाडा आहे तेव्हा जाहिरातीची गरज नाही. फक्त दारी आल्यावर या वाड्यात जायचे कि त्या हा ग्राहकांना संभ्रम. सकाळच्या वेळी लोक तिथल्या खूर्चीत येऊन बसत आणि महादू वा त्याचे वडील त्यांची दाढी कटींग करत. वरच्या खोलीतली बाज आणि तिच्यावरची मऊ मऊ गादी, रेडिओ मला फार आवडले होते. मी आणि महादू तिथे झोपणार होतो. तत्पूर्वी आम्हा दोघांची 'खानदान' विषयावर चर्चा रंगली.
"माझी एक प्रेयसी मोठ्या खानदानातून होती. ..." मधेच कुठेतरी विषय आला म्हणून महादू सांगू लागला. त्याला प्रेयसी होती हेच त्याला मुख्यत्वे सांगायचे असले तरी मला मूळ विषय सोडायचा नव्हता.
"खानदानी म्हणजे ब्राह्मण, मराठा, लिंगायत होती का?" मी त्याला तोडून विचारले.
"का? फक्त ब्राह्मण आणि मराठेच खानदानी असतात का? वारकाचे लोक खानदानी नसतात का? खानदान वेगळे आणि जात वेगळी!!!"
त्याच्या एका रपक्यासरशी मनातली सगळी उच्च जातींशी निगडीत अनावश्यक भंडावळ उतरली. प्रत्येक जातीतले लोक आपल्याला श्रेष्ठ मानतात हे मी नेहमी विसरे आणि महादू प्रत्येक वेळी मला त्याची खर्डी आठवण करून देई.
"तुमच्या चुलीचे दगड, वेगळी भांडी आणून ठेवलीत." बालाजीमामांची आई आईला म्हणाली. त्यांनी आईकरिता मीठ, मिरचू, पीठही वेगळे काढून ठेवले होते.
"हा बालाजी मला ताई म्हणतो ना? माझा कोणी भाऊ नाही. त्याची बहिण म्हणून दिवाळीला आले. मग त्याची बहिण म्हणूनच राहणार. मला काही वेगळी चूल वैगेरे नको."
आई ओशाळली असावी. आणि आई आली आहे म्हणजे घरात काही अब्राह्मणी नको हे ही ओघाने आलेच.
पुरुषाच्या नहाण्याच्या दिवशी बालाजीमामांच्या बहिणीने मला अभ्यंग स्नान घातले. हिवाळ्याच्या दिवसांत अजून उजाडलेलेही नसताना सकाळी लवकर उठण्याचा सगळा त्रागा ते वत्तलातून काढलेले धारोष्ण पाणी अंगावर पडू लागले तसा निघून गेला. थोडावेळ कूडकूडल्यानंतर घातलेले कपडे नविन होते म्हणून गरम वाटायला लागले. सगळीकडे गोडधोड. रोषणाई. भुईनळे उभे आणि आडवे उडवून झाले. एक भुईनळा शेजारच्या बुर्जावर गेला आणि रात्री त्याच्यावरच्या कोरड्या गवताला प्रेक्षणीय आग लागली. एके सकाळी 'कोण्या मूर्खाने तुझी ही कटींग केली होती' म्हणत महादूने माझी नव्याने कटींग केली. भाऊबीजेच्या आदल्या रात्री बालाजीमामांचे मेव्हणे आले. घरात सगळीकडे धांदल. प्रेमाला, कौतूकाला उत. रात्री चुलत मामांच्या, त्यांच्या बहिणींच्या आणि मेव्हण्यांच्या मुलींना रांगेत बसवून शालेय प्रश्न विचारले, गाणी गावून घेतली आणि कौतुक करत त्यांना झोपवले.
भाऊबीजेच्या दिवशी सकाळी मी वरच्या खोपट्यातून पाहत होतो. मामांच्या मेव्हण्यांनी अंगणात त्यांचा कोणता भेट वैगेरे देण्याचा समारंभ चालवला होता. मी ही वरून खाली आलो आणि चटईच्या शेजारी उभा राहिलो. तीन मेव्हण्यांनी त्यांना आळीपाळीने उभे कूंकू लावले. एक नारळ हळदीकूंकू लावून मांडीवर ठेवला. मग एका प्लास्टीकच्या थैलीतून काढून एक टॉवेल आणि एक टोपी दिली. बालाजीमामा अचानक उसळले. त्यांचा आवाज फार चढला होता.
"मी आजपावेतो तुमच्याकडून काही घेतलं नाही. इतक्या वर्षांनी दिवाळीचा आहेर घेऊन आलात तर तो तरी धड घेऊन यायचात."
ताई बाजूलाच उभी होती. ती थराथरा कापू लागली. मी ही स्तंभित झालो. बालाजीमामांचा हा अवतार कधीच पाहिला नव्हता. त्यांनी त्यांच्या साधारण पट्टीत हेच बोल बोलले असते तर एव्हाना मी माझे नैतिकतेचे लेक्चर लांबपर्यंत आणले असते. पण त्यांचा संतप्त चेहरा पाहून माझीही बोलायची धमक झाली नाही.
"आणायचा तर पूर्ण आहेर आणायचा. एक्-दोन वर्षांतून एकदा तर द्यायचाय. बरं पूर्ण नाही तर हा जो टॉवेल आणलाय तो तरी धड आणायचा.टर्किशचा आणायचा. चार महिन्यात मातेरं होऊन जाईल असला टॉवेल आम्हाला भीक म्हणून आणलाय का?" बालाजीमामा पेटले होते.
आई ही गडबड ऐकून धावत पळत बाहेर आली. आईला पाहताच ताई थोडी निर्धास्तावली.
"काय बालाजी, हे काय लावलंय सणासुदीच्या दिवशी? आपल्या घरी पाहुणे आलेत ते, बायकोच्या माहेरचे झाले म्हणून काय झाले?"
"ताई, प्रश्न काय आहेर आणलाय याचा नाही. पण यांची वृत्ती पाहा. कधी विचारपूस नाही, कधी भेट नाही. माझी तर नाहीच नाही पण स्वतःच्या बहिणीचीही नाही. खेळ लावलाय का?"
"आता मी तुम्हाला सांगतेय. जे काय दिलं आहे ते प्रेमानं घ्या आणि उठा."
बालाजीमामा पुढे काही बोलले नाहीत. आईला घरी बोलावून तिचं न ऐकणं त्यांना धर्मसंकटात टाकणार होतं. आपण आउट झालो नाहीत हे पक्के माहित असणारा बॅटस्मॅन फक्त एंपायरने आउट दिल्यामुळे जसा नारीजीचे मैदान सोडतो, तसे ते तिथून निघून गेले. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहिला नसता तर बालाजीमामा असे वागू शकतात हे मला पटणे अवघड होते.
आता मी आठवी नववीतून अकरावी बारावीत आलो होतो. मी बालाजीमामा घरी नसताना जेव्हा त्यांच्या घरी जाई तेव्हा आई मला 'तिकडे जास्त बसत जाऊ नकोस' म्हणायची. ताई मात्र मला तितक्याच आग्रहाने बोलावी. हळूहळू मलाही एकट्या बाईमाणसाकडे जास्त जाऊ नये हे उमगू लागले होते. मग मात्र मी मामा आले कि लगेच त्यांच्याकडे दाखल होत असे. आता मामांचे प्रमोशनही झाले होते. ते छानश्या बाळाचे पप्पा झाले होते. पण दुसरीकडे ताई आणि आईच्या गुप्त गप्पांत वाढ झालेली. मला सुगावा लागला कि मामांना समजावण्यासाठी ताई आईला बर्याच गोष्टी सांगत असे. म्हणजे सर्व काही पहिल्या इतके गोड नव्हते. बालाजीमामांचा ताईंच्या माहेरबद्दलच्यांचा रोष वाढला होता. ताईबद्दलही रोष वाढला असावा. त्यांच्याकडून बायकोबद्दलच्या प्रेमाची सहज, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष होणारी अभिव्यक्ति मंदावली होती आणि ती नव्या वातावरणात जाणवत होती. साथ लेकिन साथ में नहीं. क्वचित मी ताईला आईकडे रडताना पाही. एकदा तर चांगले डोळे सुजलेले रडून रडून. नंतर तर त्यांच्या खोलीत आणि आमच्या खोलीत जो समाईक दरवाजा होता त्यातून मामांच्या जोरजोरात बोलण्याचा आवाज येई. तो जास्तच झाल्यावर आई सरळ जाऊन त्यांची कडी बडवे आणि 'बालाजी, आता शांत हो बरं' म्हणे. आई कधी कधी तासन तास मामांना वा दोघांना समजावताना आढळे पण मी गेलो कि विषय बदलत. माझ्यापासून घाबरायचे काय आणि लपवायचे काय? पण माझे आदर्श वर्तनाचे व्याख्यान त्यांना कशापेक्षाही जड जात असावे. दिवाळीच्या प्रसंगी मेव्हणे कसे बरोबर होते आणि आपण कसे चूक होतो हे मी त्यांच्याकडून कैकदा वदवून घेऊनही माझा नीटसा संतोष झाला नव्हता! बायकोला कोणत्या पट्टीत बोलावे याचे व्याख्यान मी त्यांना पूनःपूनः देई त्याचीही भिती त्यांना होतीच.
बालाजीमामा जलवितरण खात्यात कोणी क्लर्क वा तृतीयश्रेणीचे अधिकारी असावेत. पुढे एकदा त्यांनी मला सात हजार इतकी मोठी रक्कम एकट्याने घरून ऑफिसात आणायला सांगीतली होती. कोणताही घोळ न करता मी ती नेऊन दिली खरी पण ते करत असताना माझ्या मनात जे भितीदायक विचार आले त्यात थोडी भिती त्यांची स्वतःचीच वाटली होती. त्यानंतर बालाजीमामांचे वास्तविक प्रमोशन झालेले. त्यात त्यांनी आपल्या कार्यालयातल्या सगळ्या सहकार्यांना अधिकार्यांना घरी जेवायला बोलावलेले. त्यात पाणीखात्याचे प्रमुख देखिल आलेले. बालाजीमामांनी त्यावेळी किती म्हणून सुचना दिल्या. त्यावेळी म्हशी सोडू, आणू नका; पापडे, मिरच्या वाळायला घालू नका, इत्यादि इत्यादि. अधिकार्यांची त्यांनी किती देखरेख केलेली. अधिकार्यांचे त्यांच्याबद्दलचे मत देखिल फार चांगले होते. सर्वात मोठे अधिकारी, ईनामदार नाव होते त्यांचे, ते कोणत्याही वरीष्ठांप्रमाणेच जास्त बोलताना आढळले नाहीत पण जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांनी बालाजीमामांच्या आतिथ्याचे चांगले कौतुक केले. ते लवकर निघून गेले तरी त्यांच्या वागण्याने बालाजीमामांना ऑफिसातही कमी सन्मान नाही हे सिद्ध झाले.
नुकतीच रात्र पडली होती म्हणा. अंधार दाटून आलेला. पाऊस चालू होण्याचे दिवस होते तरीही उकाडा नव्हता. बाबूराव पहिल्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. मामांचे आणि त्यांच्या आज घातलेल्या जेवणाचे कौतुक चालू होते. वसरीला सहाफूटी बालाजीमामा प्रवेशाच्या गल्लीकडे पण गल्लीला पाठमोरे, भिंतीला पाठ लावून उभे होते. बाकी सगळे बसलेले. राजी आणि ताई भाजी घ्यायला बाजारात गेलेल्या. आम्ही चार भावंडे, अण्णा, आई, बाबूराव, त्यांची बायको, न लग्न झालेल्या पाच पोरी, आठवा कृष्ण नरसप्पा, जिंदगानी, तिची तीन लेकरं, मराठ्यांच्या कुटुंबाचे पती-पत्नी, लेकरे, शेजारची सिंधू आणि दोघे चौघे असा सगळा पसारा अंगणात पसरलेला. बालाजीमामा नेहमीच्याच नम्रपणे ऑफिसातल्या त्या वेगवेगळ्या अधिकार्यांच्या कहाण्या सांगत होते. तत्क्षणी पावसाला सुरुवात झाली आणि सगळीकडे पळापळ चालू झाली. वाळत घातलेले कपडे, उन्हात घातलेल्या दाळी घरात आणल्या गेल्या. अंगणातून सगळे वसरीत आले आणि दाटीवाटीने बसले. अण्णा विषय राजकारणावर नेत, बाबूराव शेतीवर नेत, जिंदगानी बॉलिवूडवर नेई आणि मी पुन्हा पाणीखात्यावर आणे. दहा पाच मिनिटात अंगण पाण्याने भरलं आणि मोठमोठे गढूळ पाट वाहू लागले. जमिनीवर, कौलारूंवर, काँक्रीट्वर, अल्यूमिनिअमच्या पत्र्यांवर आणि साचलेल्या पाण्यावर पडणार्या पावसाच्या थेंबांनी एक वेगळीच सिंफोनी साधली होती. आईने सगळ्यांसाठी चहा करायला घातला होता आणि भज्यांची तयारीही चालवली होती.
इतक्यात वाड्याच्या मुख्य दरवाज्याच्या कडीचा आवाज आला.वाड्याच्या दरवाज्याचे आख्खे बोळ वसरीतून दिसत नसे, फक्त त्याचा आतला शेवट दिसे. राजी आणि ताईच्या पावलांचा आवाज झाला. प्रवेशद्वाराच्या गल्लीतून अंगणात त्या जशा आल्या तशा आम्हाला दिसल्या. ताई पुढे होती आणि राजी मागे. भरलेल्या पिशव्या घेऊन पाच फुटी ताई ताठली होती. जोराचा पाऊस नसता तर पिशव्या घ्यायला मी पळालोच असतो. साडी, पिशव्या पाण्याच्या पातळीपासून वर ठेवण्यासाठी तिला कसरत करावी लागत होती. त्यांचा इतका एक फ्लॅश दिसेपर्यंत लाईट गेली. अण्णा बॅटरीत सेल भरू लागल्याचा आवाज आला. ताई पाण्यातून चुळुक चुळुक पाय टाकीत दोन पावले पुढे सरकली असेल नसेल तोपर्यंतच तिने हातातली पिशवी तशीच पाण्यात टाकून दिली आणि ८-१० फूट वेगात पळत, पाणी उडण्याची खंत न करता, येऊन सरळ नवर्याला मिठी मारली. क्षणार्धात काहीतरी घडलंय याची प्रत्येकाला कल्पना आली. तितक्यात लाईट आली. बालाजीमामांनी तिला लाजेने दूर केले नाही. ताई प्रचंड भिजली होती आणि तिने बालाजीमामांभोवती आपल्या हातांचा घट्ट गराडा घातला होता. लाईट आल्याचे अजूनही तिला जाणवले नव्हते, कदाचित तिने डोळे फार घट्ट मिटले असावेत वा ती या विश्वातच नसावी. सगळे आ वासून पाहत होते. जिंदगानी तर अजूनच. कोणत्याही बॉलिवूडपटाला लाजवेल इतका आवेग आणि इतकी नैसर्गिकता त्या मिलनात भरली होती. मर्यादा आणि संकोचांचे अडसर ते दोघेही क्षणभर जणू विसरूनच गेले होते. 'मला तूच तेव्हढा आहेस.' हे ताईनं बालाजीमामांना एक शब्द न बोलता हृदयपणे सांगीतलं होतं. भयाने ती जशी पूर्ण पांढरी पडली होती तशी नवर्याच्या स्पर्शाने विसावलीही होती. तो विसावा बालाजीमामांना जशास तसा जाणवला होता. मिनिटभराच्या शांततेनंतर तिच्या केसांवरून हात फिरवत बालाजीमामांनी तिला अलगदपणे दूर केले. इतर सगळ्यांचे जबडेही जुळले आणि ताईही लाजून घरात पळून गेली. बालाजीमामाही पुढच्या बाजूने पूर्ण ओले झाले होते.
"काय झालं? काय झालं? काय झालं बालाजीमामा?" राजीने पावसात भिजलेली ताईची पिशवी उचलत, सगळ्यांच्या सुरात सुर मिळवत विचारलं.
"पायाखाली काही सळसळलं असेल तिच्या." आई आतून म्हणाली.
नंतर आईच्या म्हणण्याची ताईने पुष्टी केली. बरेच दिवस सरले पण आमच्या आणि बालाजीमामांच्या खोल्यांमधल्या दरवाज्यातून नंतर कधी कोणता जोराचा आवाज ऐकू आला नाही.
(समाप्त)
No comments:
Post a Comment