“ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड ते बऱ्हाणपूर
“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449
तिसरा दिवस : ०५ जानेवारी २०१२
सिंदखेड राजा – मलकापूर मार्गे बुलढाणा – मुक्ताईनगर
आज देखील सकाळी ६ वाजता उठलो, आज चक्क अंघोळ केली :). सर्व काही आवरून ७ वाजता गुरुद्वारा मध्ये जाऊन आलो. आज गाडीमध्ये सामान चढवण्यासाठी ५ जण गेलो. २०० जणांचे सामान चढवताना अक्षरशः घाम निघतो. लोक पण अगदी मुंबई-न्यूयॉर्क प्रवास करत असल्यासारखे सामान घेऊन आले होते. अर्थात सर्वजण नाही पण बरेचजण. नाश्ता म्हणून फोडणीचा भात होता, एकदम मस्त झाला होता. साधारण ०९०० वाजता औरंगाबाद सोडले आणि सिंदखेड राजाच्या दिशेने मार्गस्थ झालो. वाटेत बऱ्याच ठिकाणी मोहिमेच जोरदार स्वागत झाल. गावकरी अगदी प्रेमाने विचारपूस करत होते. गावातल्या स्त्रिया , दुचाकी चालवणाऱ्या स्त्री वर्गाकडे कौतुकाने पाहत होत्या.पण या सर्व सत्कार आणि कौतुक सोहळ्यांमुळे मोहिमेचा वेग मंदावत चालल होता. ११०० वाजता लखुजीराजे जाधवांच्या राजवाड्यामध्ये पोहचलो.
लखुजीराव जाधव राजवाड्याचे प्रवेशद्वार
राजवाड्याचे प्रवेशद्वाराजवळ असलेली तोफ, मागं उत्खननात सापडलेल्या मूर्ती दिसत आहेत.
राजवाड्याच्या प्रवेशद्वाराचा मागील भाग
उत्खननात सापडलेली मूर्ती
आई जिजामातासाहेबांच जन्मस्थान बघितलं. कितीतरी वेळा आपल्या ऐतिहासिक वस्तू बघितल्या कि मन उद्विग्न होत, आपल सरकार या बाबतीत अगदीच उदासीन आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्याला इतका मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असताना. ग्रामस्थांनी मात्र अगदी आपुलकीने चौकशी केली आणि तिथल्या ठिकाणांची माहिती दिली. अशी माहिती ऐकत असताना मन नकळत भूतकाळात निघून गेले. वाटल १६२९ मध्ये जेव्हा राजे लखुजी आणि त्याचे ३ मुलगे अचलोजी, राघोजीराव आणि यशवंतराव यांची निजामदरबारात कत्तल झाल्यांनतर याच वाड्यावर किती मोठी शोककळा पसरली असेल.
राजवाडयाविषयी थोडेसे :
सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्यातील तालुक्याचे ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान.१५७६ साली लाखुजीराव जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले. पूर्वी ते निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते. वाड्याचे बांधकाम १५७६ च्यचं सुमारास झालेला असून जिजाऊसाहेबांचा जन्म याच वाड्यात झाला. वाड्याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून बांधकाम दगडात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी नारळांचे तोरण होय. प्रवेशद्वार तीनमजली असून खाली देवड्या त्यावर नगारखाना त्यावर संरक्षण भिंत उभारलेला सज्जा असे मराठी स्थापत्तीय दरवाजाचे स्वरूप आहे.
मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करताच समोर दगडी बांधकाम केलेले जोते दिसतात. येते जाधवरावांचे निवासाची जागा असावी असे तर्क आहेत. या चौरसाकृती भागाच्या खाली तळघरे आहेत. तळघरात हवा खेळती रहावी म्हणून झरोकेही आहेत. राजवाड्यांच्या नैऋत्येकडील टोकास म्हाळसा महाल होता व या महालातच जिजाऊसाहेबांचा जन्म झाला होता. जिजाऊसाहेबांचा जन्म म्हाळसाबाई यांच्या पोटी हेमलंबी नामसंवस्तर शके १५१९ च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरवारी पुष्य नक्षत्रावर सुर्योदयसमयी( १२ जानेवारी १५९८ रोजी सकाळी ६ वाजता ) झाला. उत्खननात सापडलेल्या उमा महेश यांसारख्या मूर्ती अजूनही वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ आहेत. दगडी नारळांचे तोरण मात्र आता नाही. आता प्रवेशद्वाराची डागडुजी करण्यात आलेली आहे. ( राजवाड्याच्या इथे असलेल्या पाटीवरील मजकूर )
वरील चित्रात जे फुल दिसत आहे, त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याची डाव्या बाजूची पाकळी तुटलेली आहे हे लक्षात येते. हे फुल जिथे आहे ती जागा एकदम अंधारात आहे. समजा जर राजवाडा शत्रुपक्षाने जिंकला तर भुयारात शिरायचे आणि हे फुलं जिथे हाताला लागेल आणि त्याची पाकळी जिथे तुटलेली आहे त्या दिशेला वळायचे. त्या दिशेने जाणारे भुयार राजवाड्याबाहेर घेऊन जाते.
याच महालात जिजामातासाहेबांचा जन्म झाला असे म्हणतात.
जिजाऊ सृष्टी
नंतर तिथल्याच एका शिव मंदिरात दुपारच जेवण आटोपून आम्ही मुक्ताईनगरच्या दिशेने प्रस्थान केले. जेवणाचा बेत पण अगदी चपाती, आमटी, शिरा, जिरे भात असा फक्कड होता. आम्ही मलकापूर मार्गे बुलढाणा करून मुक्ताईनगरला पोहचलो. मोहिमेची आणि आमची वाटेत चुकामुक झाली असल्याने आम्ही मोहिमेच्या अगोदर पोहचलो. साधारण ३० मि. च्या अंतराने मोहीम देखील येऊन धडकली. आल्या आल्या सगळ्यांची आपापले भ्रमणध्वनी, कॅमेरे charge करण्यासाठी गर्दी होत असे. आम्ही अगोदरच आल्यामुळे आमचे भ्रमणध्वनी, कॅमेरे charge करण्यासाठी लावले होते. आज जेवायला फक्त भागारच होती. आणि भूक तर सपाटून लागली होती. त्यात भगर पण तिखट होती. आता जिभेचे चोचले नाही म्हणा पण पोटात काहीतरी ढकलण्यावाचून गत्यंतर नव्हते. सगळ्यांचीच अवस्था बऱ्यापैकी वाईट होती. मी एकाला म्हणतच होतो अस उपाशी पोटी झोपण्यापूर्वी गावात जाऊन काही खायला मिळतं का बघून येऊ. तेव्हढ्यात माझ्या मागे बसलेल्या काकांनी मला ४ दशम्या दिल्या. फुलगावच्या रात्रीच्या सभेत काका माझ्याशेजारी बसले होते आणि मी आपला, मी तयार करून आणलेला ठिकाण व त्यामधील अंतरे वाचण्यात दंग होतो. काकांना तो कागद खूप उपयोगाचा वाटला कारण रोज किती किमी जायचं आहे ,दोन गावांमधील अंतरे किती आहेत, आजपर्यंत किती प्रवास झाला, रोजचे जेवण, मुकाम कोणत्या गावात आहे, अस सगळं काही मी तयार केलेल्या कागदावर होतं. काकांनी मला तो कागद मागितला व माझ्या जवळ एक जादाची असणारी प्रत मी काकांना दिली. म्हटलं असू द्या तुमच्याकडे.
गीतेत म्हटलंच आहे कर्मण्येवाधिकारस्ते.....
मुक्ताईनगर विषयी थोडेसे :
मुक्ताईनगर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामाच्या पालखी सोहळ्या खालोखाल श्री संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताईचा पालखी सोहळा मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून सुरू होतो.176 वर्षांची परंपरा असलेला हा पालखी सोहळा मुक्ताईनगर संस्थान चालविते.
आज दिवसभरात २-३ गाड्यांचे अपघात झाले होते. छोटे अपघात तर होणारच होते,,, एका दुचाकीच झालं काय, गाड्या एका रेषेत सरळ चालल्यामुळे पुढच्याने ब्रेक मारला कि मागच्याला देखील ताबडतोब ब्रेक मारावा लागतो. आता एका काकांना तसं करायला जमलं नाही, त्यांनी गाडी बाजूला घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याचं पुढच चाक, पुढच्या गाडीच्या Silencer आणि मागच चाक यांच्या मध्ये घुसल आणि त्यामुळे त्या गाडीचा Silencer बाहेर आला.त्यामुळे मी काहीही झाल तरी आपली गाडी समोरच्या गाडीच्या थोडीशी डाव्या अथवा उजव्या हातालाच ठेवायचो.
आता म्हणा असे छोटे मोठे अपघात होतच राहणार होते. मी तर हेल्मेट, Hand gloves, arm guards, knee guards, shoes अस सगळ घालून असल्यामुळे थोडासा वैतागून गेलो होतो पण माड्याचे शब्द आठवायचे साऱ्या आपल करिअर यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपला मी गपगुमान ते न काढता सगळीकडे फिरायचो. आम्हाला सगळ्यांनाच लोक थांबून थांबून विचारायचे कुठून आलात, कुठे चाललात, आणि सगळेजण अगदी न थकता त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. वाईट एकाच गोष्टीच वाटत अजूनही महाराष्ट्रात लोकांना पानिपतच युद्ध म्हणजे काय ते सांगाव लागतं. मुक्ताईनगर मध्ये सगळ्यात वाईट वाटलं म्हणजे मंदिराच्या बाहेरच असणाऱ्या मैदानात सगळे भाविक सकाळचा कार्यक्रम उरकून येत असतं आणि त्यामुळे सकाळी तिथे खूप घाण वास सुटलेला असायचा. महाराष्ट्र शासन साधी शौचालय बंधू शकत नाही ?
आज देखील झोपायला सतरंज्याच होत्या.आमच्यासारख्या ट्रेकर लोकांच एक बरं असतं सतरंज्या असल्या तरी आमच्यासाठी सोन्याहून पिवळ. पण मोहिमेमधील लोक पण समजूतदारपणे वागत होते. आज रात्रीची सभा वेळेअभावी झाली नाही. सकाळी ससे पकडायला गर्दी होणार हे माझ्या लक्षात आलं आणि त्यात मग केक कापणे असे प्रकार घडणारं. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी मी रात्रीच डब्बा टाकून आलो.
आजचा प्रवास : २६४.५ किमी
चौथा दिवस : ०६ जानेवारी २०१२
इच्छापूर – शहापूर – बऱ्हाणपूर – खंडवा
आज सकाळी ५ वाजताच जाग आली. आज उठल्या उठल्याच फार मळमळतं होत. दात घासल्यानंतर २-३ उलट्या झाल्या. कालच्या भगरीचा प्रताप असणार मनात म्हटलं. सगळ आवरून झाल्यावर मंदिरात जाऊन मुक्ताबाई, ज्ञानेश्वर याचं दर्शन घेतलं. आज सकाळी हेल्मेटच्या ring-lock ची चावी हरवली. सगळीकडे शोधलं. आता एकमेव पर्याय वापरायच ठरलं. जेव्हा सगळ्या गाड्या एका रांगेत उभ्या झाल्या आपल्या ring-lock सारख दुसर कुणाच ring-lock आहे का हे बघायला सुरवात केली आणि शेवटी भोसले काकांच्या ring-lock ची चावी लागली आणि आमच्या दोघांची हेल्मेट निघाले. काकांकडे दोन चाव्या असल्याने एक चावी तुम्हालाच ठेवा काकांनी सांगितलं. चला, आता सगळ्यात पहिल्यांदा गाडीच्या आणि ring-lock च्या बनावट चाव्या बनवाव्या अस ठरलं.
काही फलक, जे खरोखरच तुम्हाला गाडीचा वेग कमी करण्यास भाग पाडतात, मला वाटत हे गतीरोधकापेक्षा वेग नियंत्रणाचे काम चांगल्या प्रकारे करतात.
आज आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडणार होतो.
आणि आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडली.
लवकरच आम्ही इच्छापूर गाठल आणि साधारण ०८१७ ला मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केला. मोहिमेबरोबर थांबल तर बरीचशी ठिकाण पाहायची राहून जाणार हे माझ्या लक्षात आल होतं. तेव्हा शक्य तेवढा वेळ मोहिमेबरोबर राहायचं आणि एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असला कि जवळपासचं एखाद ठिकाण बघून यायचं अस माझ आणि स्वागतच ठरलं. जास्त कुणाला सांगायचं नाही कारण मग मोहिमेची संख्या रोडावली असती आणि ती संधी लवकरच आली.
कुठही हि थांबल कि तिथली बच्चेकंपनी गोळा व्हायची आणि मग छायाचित्रण समारंभ पार पडायचा.
असाच एक क्षण (स्थळ : इच्छापूर)
आम्ही बऱ्हाणपूर मध्ये ठीक १०४० ला घुसलो.
बऱ्हाणपूरचे प्रवेशद्वार :
मुघलांच्या महत्वपूर्ण ठाण्यांपैकी एक असलेले बऱ्हाणपूर अजून हि त्याची तटबंदी राखून आहे आणि बऱ्हाणपूर मध्ये झालेले मोहिमेच स्वागत मला नाही वाटत मोहिमेतील कोणताही सदस्य विसरू शकेल. आम्ही अक्षरशः फुलांच्या वर्षावात न्हाऊन निघत होतो. संपूर्ण रस्त्यांवर फुलांचा खच पडला होता. संपूर्ण शहर आमच्या स्वागताला जमल होत. रस्त्यांवरून जाताना दोन्ही बाजूंनी पुष्पवर्षाव होत होता. सर्व लोक आम्हाला जेवण झाल का ? पाणी हवय का? अशी काळजीने विचारपूस करत होते.संपूर्ण मोहीम या झालेल्या स्वागताने भारावून गेली होती.
बऱ्हाणपूरची तटबंदी :
बऱ्हाणपूरमध्ये स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती.
दुपारी सभा चालू असताना मी आणि स्वागतने आमचा मोर्चा शाही महाल या किल्ल्याकडे वळवला. आम्ही गावात शिरल्या शिरल्याच गावात पाहण्यासारख काय आहे याची विचारपूस करायचो.
बऱ्हाणपूर विषयी थोडेसे :
बऱ्हाणपूर हा मध्य प्रदेशातील एक जिल्हा आहे. हे शहर ताप्ती नदीच्या उत्तर तटावर स्थित आहे. खुल्दाबाद्च्या बुऱ्हाण उद्दिन गरीब या सुफी संतावरून या शहराचे नाव बऱ्हाणपूर असे ठेवण्यात आले आहे. इ.स. १४०० मध्ये फारुकी सुलतान, नसीर खानने हे शहर वसवले. शेख झैनुद्दिनच्या आज्ञेवरून त्याने या शहराचे नाव बऱ्हाणपूर असे ठेवले. १४५७ मध्ये मिरान अली खान तिसरा हा फारुकी सुलतान सत्तेवर आला. त्याच्या इ.स. १५०१ पर्यंतच्या कारकिर्दीत बऱ्हाणपूर हे व्यापाराचे आणि कापड उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले. इ.स. १६०१ मध्ये मुघल सम्राट अकबर याने खानदेश सुलतानाला हरवून बऱ्हाणपूरवर कब्जा केला आणि बऱ्हाणपूर मुघल साम्राज्याच्या खानदेश सुभ्याची राजधानी बनले. दक्खनच्या मुघल साम्राज्यावर इ.स. १६०९ मध्ये जहांगीरने त्याचा दुसरा मुलगा परवेझ याला नेमले आणि त्याने बऱ्हाणपूरला मुख्यालयाचा दर्जा दिला.
छत्रपती संभाजीने मराठी साम्राज्याच्या सत्तेवर आल्यानंतर बऱ्हाणपूरची लुट करून मुघल सत्तेकला हादरा दिला होता. औरंगजेबाच्या फौजा खानदेशात आणण्यासाठी नंतर संताजी घोरपडे याने बऱ्हाणपूर आणि खानदेश सुभ्यावर हल्ला चढवला होता. पेशवा बाळाजी बाजीराव यांनी हा मुलुख काबीज केला होता. त्यांनी सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्या फौजा पाठवून हैदराबादच्या निजामाचा पराभव केला होता. याच शहराच्या बाहेर असलेल्या अशेरीगढ किल्ल्याला दख्खनचा दरवाजा असे म्हणतात.
शाही महाल किल्ला :
शाही किल्ल्यामध्ये या बाईसाहेब एकदम निवांत बागडत होत्या.
हा किल्ला ८० फुटाच्या उंचीवर वसला आहे. हा किल्ला आदिलखान द्वितीय याने १४५७ ते १५०३ च्या सुमारास बांधला. एकेकाळी हा किल्ला सात मजल्यांची उंच इमारत होता. आता याचे काहीच माजले शिल्लक आहेत.हा किल्ला ताप्ती नदीच्या किनारी वसला आहे. याच भव्य प्रवेश द्वार पूर्व दिशेला ताप्ती नदीच्या दिशेला आहे.महालामध्ये सगळ्यात जुने जतन करून ठेवलेले अवशेष म्हणजे जनाना स्नानगृह. त्याच्या घुमटावर कोरलेली चित्रशैली १७ व्या शतकातील आहे.
स्नानगृहामधील नक्षीकाम :
किल्ल्यावरून ताप्ती नदीचे विहंगम असे दृश्य दिसते.
शाही किल्ल्यामधून दिसणारे ताप्ती नदीचे सौंदर्य :
दिवान-ए-आम आणि दिवान-ए-खास किल्ल्याच्या वरच्या भागात बांधले गेले होते. किल्ला आता भग्नावस्थेत असल्याने याचे थोडेसेच अवशेष नजरेस पडतात. तरीही किल्ला त्यावरील अप्रतिम कलाकुसरीची साक्ष देतो. किल्ल्यावरील मुख्य आकर्षण हे शाही स्नानगृह आहे जे शाहजहान ने त्याची बायको बेगम मुमताज हिच्यासाठी बांधले होते. तिने याच किल्ल्यामध्ये तिच्या चौदाव्या बाळंतपणात ७ जून १६३९ मध्ये प्राण सोडला. तिला ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर जैनाबाद्च्या प्रसिद्ध बागेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात दफन करण्यात आले होते. किल्ल्याचे ताप्ती नदीला येणाऱ्या पुरापासून रक्षण करण्याकरिता विटा, चुना आणि दगड यांचा वापर करून ताप्ती नदीच्या बाजूला एक भक्कम भिंत उभी केली आहे. या भिंतीची रुंदी १० फुट आहे. हि भिंत ‘नौ गजी’ या नावाने प्रसिद्ध आहे.
‘नौ गजी’ -
या भिंतीच्या वरच्या बाजूला भिंतीत उतरणारा एक जीना आहे जो भिंतीच्या आतमधुनच नदीच्या बाजूला घेऊन जातो. या भिंतीला लागूनच एका बुरजाची निर्मिती केली गेली होती. जो आता पडलेल्या अवस्थेत आहे तरीही त्याचा सांगाडा स्पष्टपणे नजरेत भरतो. या बुरुजाला “ममोला” म्हणून ओळखले जायचे. इथून बादशाहाच्या राण्या आणि राजकन्या नदीचे विहंगम दृश्य बघत बसायच्या असे म्हणतात. ‘नौ गजी’ भिंतीच्या महालाच्या दक्षिणेला भव्य हत्ती महाल नजरेस पडतो, जो कि आता बऱ्याच ढासळलेल्या अवस्थेत आहे. या महालाकडे जाण्यासाठी ‘नौ गजी’ भिंतीच्या जवळूनच एक जीना आहे. या महालाच्या वरच्या भागात असलेल्या ३ सुंदर कमानी आजही उभ्या आहेत. इ.स. १६०३ मुघल बादशहाच्या येण्यानंतर त्यांची या ठिकाणी सत्ता कायम राहिली. शाहजहान बऱ्हाणपूरचा सुभेदार होता. इ.स. १६२१ मध्ये तो दक्षिणेकडील आक्रमणाच्या उद्देशाने इकडे आला आणि नंतर कितीतरी वर्षे इकडेच राहिला. या त्याच्या कालावधीत अनेक सुंदर इमारती बांधल्या गेल्या. विशेषतः आग्रा आणि दिल्लीच्या प्रकारातले दिवान-ए-आम बनवले गेले. राजमुकुट धारण केल्यानंतरही ३ वर्षापर्यंत यामध्येच राज्यकारभार केला गेला. औरंगजेब, मोहम्मद शुजा आणि शाह आलम यांनी सुद्धा या किल्ल्यामध्ये निवास केला होता.
शाही किल्ल्याचा आतील भाग :
महाल :
या किल्ल्यामध्ये अनेक घटना घडल्या. आदिल शाह आजम हुमायूं ने राज्यद्रोही हसामउद्दीन मुगलचा याच किल्ल्यामध्ये खून केला आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर फेकण्यात आले. १०९२ हि. मध्ये किल्ल्याच्या दारू कोठाराला लागलेल्या आगी मध्ये महालाची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली आणि २ खोल्या पूर्णपणे जळून गेल्या. या घटनेवेळी औरंगजेब किल्ल्यामध्ये होता. किल्ल्याच्या तोफखान्याच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. १०३७ हि. मध्ये शहाजहाननी दक्षिणेकडे मिळवलेल्या विजयाचा सोहळा इथेच संपन्न झाला होता. या वेळी शहाजहानने बऱ्हाणपूरला “दासुस सरूर” हि उपाधी दिली होती. किल्ल्याच्या दक्षिण-पूर्वेला काळ्या दगडांमध्ये एक सुंदर मशिद बांधली होती. आता या मशिदीची दक्षिणेकडील भिंत आणि एक मिनार उरला आहे. हा मिनार “लौग” आकाराचा आहे म्हणून या मशिदीला “सलौगी मशिद” म्हणतात.
“सलौगी मशिद”
या मशिदीमधील फरशी संगमरवराची होती आणि आतमधला भाग चमकणाऱ्या प्लास्टरने आणि सुंदर चित्रांनी सुशोभित केला गेला होता. आता मात्र या मशिदीची बरीच पडझड झाली आहे.
किल्ल्याची डागडुजी चालू होती.
किल्ला बघून झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा जामा मशीदीकडे वळवला.जरीपटका घातलेले दोघेजण मशीदी मध्ये प्रवेश करतानाचे बघून तिथल्या लोकांच्या भुवया उंचावल्याचे माझ्या लगेच लक्षात आले. आम्ही मात्र बिनधास्तपणे आत गेलो. मी माझे सगळे Arm Guards वगैरे काढून ठेवलं. हात पाय आणि तोंड धुतलं आणि आत गेलो. नमाज पडला. अतिशय मंत्रमुग्ध करणारी कलाकुसर आतमध्ये केली होती. आता वाटत त्यावेळी आपटे काका असते तर कितीतरी माहिती त्यांनी दिली असती.
आतमध्ये जाऊन बघतो तो अहो आश्चर्यम् !! चक्क मराठी भाषेत तेथील संस्कृत शिलालेखाचा अर्थ सांगणारा फलक लावला होता.
जामा मशिदीचे प्रवेशद्वार :
जामा मशिदीविषयी थोडसं :
इ.स. १६९० मध्ये या मशिदीचा आराखडा तयार झाला होता. पाच वर्ष दिवस-रात्र राबून हि मशीद बांधण्यात आली. हि मशीद दिल्लीच्या जामा मशिदी प्रमाणे बनवली आहे. या मशिदीच्या चारही बाजूला दुकाने आहेत, त्यामुळे ह्या परिसरात सतत वर्दळ असते. मशिदीच्या पूर्वेला प्रवेश करण्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार आहे. याची लांबी ३४ फुट आणि रुंदी १२ फुट आहे. याला जहांगीर बादशाहाच्या काळातले दरवाजे आहेत. पहिल्यांदा हा दरवाजा १२ फुट उंच होता, पण मशिदीचा भव्यपणा बघता तो खुपच छोटा होता १२८२ हि. भोपाळची बेगम सिंकंदर जहां साहिबां हज च्या यात्रेसाठी मुंबईला चालली होती, त्यावेळेस ती २-३ दिवस बऱ्हाणपूरमध्ये थांबली होती. तिला हा दरवाजा मशिदीच्या योग्यतेचा न वाटल्याने जुन्या दरवाजाच्या पुढे जमीन वाढवून नवीन दरवाजा बनवला. याची उंची जवळपास २५ फुट आहे आणि हा संपूर्णपणे दगडाचा बनवलेला आहे, याच्या छतावर सुदर अशी वेल-बुट्टीची कलाकुसर केलेली आहे.मशिदीच्या उत्तर आणि दक्षिणेला दोन हौद आहेत, लांबी ३० फुट आणि रुंदी ३० फुट आहे. यातला एक हौद मशीद बनवणाऱ्या आदिल शाह फारूकी ने बनवला आहे तर दुसरा जहांगीरच्या काळामध्ये अब्दुल रहीम खानने बनवला आहे. या हौदांमध्ये लालबाग खुनी भंडारा येथून भूमिगत असलेल्या नाल्यांद्वारा पाणी येत असे, आता हि रचना बंद पडली आहे. आता या हौदांमध्ये नळाद्वारे पाणी भरले जाते. मशिदीच्या उत्तरेला आणि दक्षिणेला दोन मीनार आहेत. या भव्य मीनारांची उंची १३० फुट आहे
(जमिनीपासून कलशांपर्यंत).
मीनार :
मीनारांच्या वर जायला चक्राकृती शिड्या आहेत. मीनारांच्या वरून संपूर्ण शहराचं दर्शन होत. या मशिदीचे मीनार दिल्लीच्या जमा माशिदीपेक्षा उंच आहेत.
हि मशीद “संगेखारा” नावाच्या दगडांपासून बनवलेली आहे. असे म्हणतात कि , या मशिदीच्या बांधकामासाठी मांडवगडच्या डोंगरांवरून हे दगड मागवले होते. दगड मागवण्यासाठी जेवढा खर्च झाला होता तो त्यावेळच्या सोन्याच्या किमती बरोबरीचा होता. हि सुंदर मशीद १५ शानदार कमानींवर उभी आहे.
प्रत्येक कमानीच्या स्तंभाच्या वरच्या भागात सुंदर सूरजमुखी फूल कोरलेले आहे.
मशिदीची आतमधील लांबी १४८ फुट आणि रुंदी ५२ फुट आहे. हि मशीद ७२ स्तंभांवर उभी आहे. या स्तंभांची जाडी १.५ फुट असून उंची ५.५ फुट आहे. छताची उंची १५ फुट आहे. दगडांना एकमेकांवर असे रचले आहे कि जसे जसे दगड ठेवत जाऊ तस तसे कमानींच्या बरोबर छत तयार होत जाते. कमानी स्वतः छत आहेत आणि त्याचा आधार पण आहेत. अशा प्रकारचे छत संपूर्ण भारतात क्वचितच बघावयास मिळते.
मशिदीच्या लांबीत ५ दालनं तर रुंदीमध्ये १५ दालनं आहेत. लांबीच्या मध्ये असलेल्या एका दालनामध्ये ५०० लोकं सहजपणे नमाज पढू शकतात. प्रत्येक दालनाच्या वरती खिडक्या आहेत. भिंतीची जाडी ५ फुट आहे. भिंतीच्या वरच्या बाजूला चारही बाजूंना दगडांवर सुंदर नक्षीकाम केलेल आहे.
बाहेरच्या बाजूला भिंतीची लांबी २५ फुट आहे. भिंतीवर पणत्या ठेवण्यासाठी देवड्या बनवलेल्या आहेत. मशिदीच्या आतमध्ये भिंतीवर १५ कमानी आहेत. प्रत्येक कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, मशिदीच्या मध्य भागातील कमानीवर आश्चर्यकारक असे नक्षीकाम केलेले आहे. मशिदीच्या मध्यभागी असलेल्या कमानीवर अरबी भाषेमध्ये एक लेख कोरलेला आहे.
हा लेख आदिलशाहच्या युगामधला आहे. या मध्ये कुरण मधल्या ओळींचा अर्थ,ज्यामध्ये मशीद निर्माण केले जाण्याचे महत्व, निर्माणकर्ता बादशाहचे नाव, इमारतीची सुंदरता, मशीद बनवल्याची तारीख आणि शेवटी लेख खोदणाऱ्याचे नाव आहे.
दुसरा लेख मशिदीच्या कोपऱ्यातील कमानीच्या वरच्या भागात आहे, या लेखामध्ये सुद्धा कुरण मधल्या ओळींचा अर्थ, फारुकी बादशहाची वंशावळ आणि शेवटी मशीद बनवल्याची तारीख आहे.
तिसरा लेख, दुसऱ्या अरबी लेखाच्या खाली आहे. हा संस्कृत आणि प्राचीन देवनागरी लिपी मध्ये कोरलेला आहे. हा सहा ओळींचा आहे.
'' स्वस्ति श्री संवत् 1646 वर्षे, शके 1511 विरोध संवत्सरे पौष, मास, शुक्ल पक्षे 10 घटिस है का हश्या, शुभ 24 योगे वाणिज्य करणे। स्पिन दिन रात्रि, घटी 11 समय कन्या लगने श्री मुबारक शाह सुत श्री एदल शाह राज्ञी यसी तिरियं निर्माता स्वधर्म पालनार्थम ''। हा लेख बादशाहाच्या धर्मनिरपेक्षतेच प्रतिक आहे. याच प्रकारचा संस्कृत आणि अरबी मध्ये असलेला लेख अशीरगढच्या जमा मशिदीमध्ये देखील आढळतो.
चौथा लेख दक्षिणेकडील मीनारवरती आढळतो. हा लेख फारसी भाषेमध्ये आहे. यामध्ये अकबर बादशाहाच्या बऱ्हाणपूर येण्याचे, अशीरगढच्या विजयाचे त्याचबरोबर बहादुरशाह फारूकी च्या आज्ञापालनचे वर्णन आहे. यानंतर अकबर बादशाहाच्या लाहोरला झालेल्या रवानगीचे वर्णन आहे.आणि शेवटी हा लेख लिहिणाऱ्या मोहम्मद मासूम चे नाव आहे. या लेखावरून असे कळते कि अशेरीगढच्या विजयानंतर अकबराने बऱ्हाणपूरला १ महिना २० दिवस आराम केला होता. शेकडो वर्षे झाल्यानंतर देखील इमारतीमध्ये कुठे भेग अथवा पडझड दिसून येत नाही.
रस्त्यांवरून मोहीम निघाली कि लहान –थोर घराघरांमधून डोकावून बघू लागायचे, असाच बऱ्हाणपूरच्या रस्त्यावर टिपलेला क्षण :
जैन मंदिर, बऱ्हाणपूर :
बऱ्हाणपूरची मजबूत तटबंदी :
साधारण १३०० च्या सुमारास आम्ही बऱ्हाणपूर सोडलं. मोहीम कुठल्यातरी गल्लीत घुसली आणि इकडे आम्ही थेट खंडवा रस्तायला लागलो होतो. वाटेत एका ठिकाणी झाशीच्या राणीचा सुंदर असा अश्वारूढ पुतळा होता. खंडव्याला जायला रस्ता कुठला असे तिथल्या एका पानपट्टीच्याच्या दुकानावर विचारले.
आणि घाट चढायला सुरवात होते न होते तोच माझ लक्ष उजव्या हाताला असलेल्या डोंगराकडे गेले.
स्वाग्या........ किल्ला ...................
पुढील भाग :
“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727
“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805
“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884
“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939
“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194
“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408
“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : http://www.maayboli.com/node/36732
“ पुणे ते पानिपत ” भाग १० : http://www.maayboli.com/node/38586
“ पुणे ते पानिपत ” भाग ११ : http://www.maayboli.com/node/38694
“ पुणे ते पानिपत ” भाग १२ : http://www.maayboli.com/node/38842
“ पुणे ते पानिपत ” भाग १३: http://www.maayboli.com/node/46062
“ पुणे ते पानिपत ” भाग १४: http://www.maayboli.com/node/51134
“ पुणे ते पानिपत ” भाग १५: http://www.maayboli.com/node/51149
हा पण भाग छान लिहलाय, बुर्हाणपुर किल्ल्याची माहीती आवडली.
पु.भा.प्र.
>>१०९२ हि. मध्ये किल्ल्याच्या दारू कोठाराला लागलेल्या आगी मध्ये महालाची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली आणि २ खोल्या पूर्णपणे जळून गेल्या. या घटनेवेळी औरंगजेब किल्ल्यामध्ये होता. किल्ल्याच्या तोफखान्याच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.<<
ही कदाचीत टायपिंग मिस्टेक असेल.:स्मित:
सारंग,
सुरेख वर्णन केलंय. तुमची आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची वृत्ती आवडली. त्यामुळेच आम्हाला हा खजिना घरबसल्या अनुभवायला मिळतोय. त्याबद्दल आभार!
जैन मंदिराचे बांधकाम आधुनिक शैलीतले वाटते. विशेषत: उंच खिडक्या आणि कमानीवरील मोक्याचा दगड (keystone) ही वैशिष्ट्ये पाश्चात्य धाटणीची वाटतात.
तसेच जामा मशीदीत हिंदू प्रतिमा (फुले, देवड्या, इत्यादि) पाहून नवल वाटले.
आ.न.,
-गा.पै.
सर्वाना धन्यवाद ,, कामाच्या गडबडीमुळे माबोवर म्हणावं तसं बसायला जमत नाही.
दिनेशदा भाग ३ मध्ये मोठ्या आकारातील फोटो टाकले आहेत.
गामा पैलवान - जैन मंदिर आतून काही बघयला वेळ मिळाला नाही, नाहीतर अजून काही रंजक बाबींवर प्रकाश टाकता आला असता.
विजय_आंग्रे - कदाचित तुम्ही म्हणता तसही असेल. ते मला www.burhanpurlive.com/old/Shahi-Qila.php इथे सापड्लं.
अरेच्या हा भाग वाचला होता की, पण प्रतिसाद द्यायला विसरलोच बहुतेक.
मस्त लिहिलं आहेस रे.....
No comments:
Post a Comment