आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install Appहैदराबाद मुक्तिसंग्रामातील दुर्लक्षित ‘माणिक’ माणिकचंद पहाडे
गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५५६ संस्थाने विलीन करून घेतली. हैदराबाद संस्थान मात्र यास दाद देत नव्हते. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कारवाईचा मार्ग सुचवला. सरदार पटेल यांनी ऑपरेशन पोलो राबवून अवघ्या तीन दिवसांत १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले. या लढ्यातील एक शूर आणि दुर्लक्षित सेनानी म्हणजे माणिकचंद पहाडे. -मुक्तिसंग्रामातील पहिला सत्याग्रह १९३८ मध्ये माणिकचंद पहाडे यांच्या नेतृत्वाखाली झाला. याच्या तयारीसाठी सार्वजनिक सभा घेणे शक्य नसल्याने निवडक कार्यकर्त्यांसाेबत बैठका झाल्या. निझामाचे सैनिक प्रत्येक गावात हजर होते. याची माहिती त्यांना समजली. हे कळाल्याने अवघ्या ६ तासांत निझामाने त्यांच्यावर औरंगाबाद जिल्हा बंदीचा हुकूम जारी केला. औरंगाबाद सरहद्दीला लष्करी तळाचे स्वरूप आले. अशा परिस्थितीतही सत्याग्रह झालाच पाहिजे, असे सर्वांनाच वाटत होते. बंदी हुकूम लागू झाला त्यावेळी पहाडे नांदगावला होते. त्यांना शहरात कसे आणायचे हा प्रश्न होता. एका कारमध्ये लपून ते शहरात पोहोचले. भराभर चालत मोंढ्यात पोहोचले आणि मध्यभागी उभे राहून त्यांनी स्टेट काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा दिल्या. खड्या आवाजात पत्रक वाचण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून हमाल, व्यापारी आणि नागरिक जमा झाले. पहिला नियोजित सत्याग्रह पार पडला. पहाडे नेमके कसे पोहोचले, हे कोडे पोलिसांना आजवर सोडवता आलेले नाही. या सत्याग्रहाबद्दल त्यांना २ वर्षे ३ महिन्यांची सक्तमजुरी आणि एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दुसरा सत्याग्रह शहरातील बड्या पुढाऱ्याने करावा असे ठरले. गोविंदभाई श्रॉफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माणिकचंद पहाडे यांचे नाव निश्चित झाले. ७ ऑगस्ट १९४७ रोजी ही सत्याग्रहाची तारीख ठरली. पोलिसांनी ताब्यात घेऊ नये म्हणून सत्याग्रहाच्या दोन दिवस आधीच चिकलठाणा परिसरातील एका शेतात लपले. त्यांच्यावर औरंगाबाद जिल्हाबंदीचा आदेश लागू होता. तसेच निझामांनी त्यांना जिंदा वा मुर्दा पकडण्याचे दिले होते. पोलिस व निमलष्करी दलाची मोठी फळी नेमण्यात आली होती. त्यांना चुकवत पहाडे इमली मैदानापासून स्मशान मारुतीमार्गे जुना मोंढा, खाराकुंआ मार्गे केळी बाजारातील तुकारामपंत देव वकील यांच्या घरात आले. ते आल्याची कुणकुण लागताच घराला पोलिसांचा वेढा पडला. गुलमंडीवरील बहुतांशी शिपाई येथे जमले होते. पोलिस घरात घुसण्यापूर्वीच ते मागील दाराने बाहेर पडले. दीड फुटाच्या बोळीतून ते गट्टानी इमारतीकडे गेले. तेथून गुलमंडीवर पाेहोचले. ते येथे येणार असल्याने गुलमंडीत लोकांची गर्दी झाली होती. तर पोलिसही डोळ्यात तेल टाकून हजर होते. तेवढ्यात शालीत चेहरा लपवत पहाडे येथे दाखल झाले. सिमंत ओट्यावर उभे राहून तोंडावरील शाल काढली आणि महात्मा गांधी की जय, हैदराबाद स्टेट काँग्रेस जिंदाबाद अशा घोषणा दिल्या व पत्रक वाचण्यास सुरुवात केली. हे पाहताच पोलिस त्यांच्यावर तुटून पडले. त्यांना खाली पाडले. नालदार बुटांनी त्यांना तुडवले. लाठ्या काठ्यांनी त्यांना मारू लागले. त्यांची दात तुटलेे. शरीर रक्तबंबाळ झाले. फरफटत पोलिस व्हॅनपर्यंत घेऊन गेले. व्हॅन चौकीत गेली. त्यांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ औरंगाबाद जिल्हा बंद पाळण्यात आला. त्यांचे धाडस कायम स्मरणात राहण्यासाठी गुलमंडीला माणिक चौक हे नाव देण्यात आले. ३ ऑक्टोबर १९५० रोजी सरदार पटेल औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी चिकलठाणा विमानतळावर ४०० जणांसमोर पहाडे यांनी ४० मिनिटे भाषण केले. ते पटेल यांनी लक्षपूर्वक एेकले. १९५२ मध्ये औरंगाबादमध्ये पंडित नेहरूंशीही त्यांची भेट झाली. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहाडे औरंगाबाद ग्रामीणमधून लढले आणि निवडून आले. हैदराबाद असेंब्लीचे पहिले लोकनियुक्त आमदार होण्याचा मान त्यांना जातो. त्यांच्या नावाने माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले. हे मराठवाड्यातले पहिले विधी महाविद्यालय आहे.
No comments:
Post a Comment