पुणे जिल्हा
पुणे जिल्हा : पश्चिम महाराष्ट्रातील एक जिल्हा. विस्तार १७० ५४’ उ. ते १९० २४’ उ. आणि ७३० १९ पू. ते ७५० १०‘ पू. यांदरम्यान. क्षेत्रफळ १५,६४० चौ. किमी. लोकसंख्या ३१,७८,०२९ (१९७१). याच्या पश्चिमेस कुलाबा, वायव्येस ठाणे, उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर, आग्नेयीस सोलापूर व दक्षिणेस सातारा हे जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ५·०९% क्षेत्र व ६·२४% लोकसंख्या या जिल्हात आहे. या जिल्ह्यात पुणे शहर, इंदापूर, बारामती, दौंड, भोर, पुरंदर, वेले (वेल्हे), खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली असे चौदा तालुके आहेत. पुणे (लोकसंख्या ८,५६,१०५ उपनगरांसह ११,३५,०३४–१९७१) हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे आहे.
भूवर्णन : पुणे जिल्ह्याचा आकार सामान्यतः त्रिकोणाकृती असून पश्चिमेकडील सह्याद्री पर्वत हा त्याचा पाया, तर आग्नेय कोपऱ्यातील भीमा व नीरा या नद्यांच्या संगमाजवळ याचा शिरोबिंदू येतो.
जिल्ह्याचे भूरूपानुसार तीन विभाग पडतात :
(१) पश्चिमेकडील १५ ते ३० किमी. रुंदीचा डोंगराळ भाग. यास ‘घाटमाथा’ असे म्हणतात. या भागात सह्याद्रीचे ओकेबोके डोंगर आणि अधूनमधून जंगले आढळतात.
(२) घाटमाथ्याच्या पूर्वेकडील १५ ते ३० किमी. रुंदीच्या या विभागास ‘मावळ’ म्हणतात. यात लहानलहान डोंगर व त्यांमधून नद्यांचे सखल प्रदेश आढळतात. घाटमाथ्यापेक्षा हा प्रदेश कमी ओबडधोबड आहे.
(३) तिसऱ्या भागात जिल्ह्यातील पूर्वेकडील व आग्नेयीकडील सपाट पठारी प्रदेश अंतर्भूत होतो. याला ‘देश’ असे म्हणतात.
जिल्ह्यात दोन पर्वतसंहती आहेत. सह्याद्रीची ११८ किमी. लांबीची मुख्य रांग म्हणजेच पहिली पर्वतसंहती होय. ही रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागात उत्तर-दक्षिण पसरली असून, जिल्ह्याच्या व रांगेच्या उत्तर टोकास असलेले हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.) हे जिल्ह्यातील अत्युच्च शिखर आहे.
याशिवाय जिवधन, धाक, अहुपे, नागफणी (ड्यूक्स नोज) ही या रांगेतील इतर प्रमुख शिखरे होत.
वायव्य कोपऱ्यातील नाणे घाट , पश्चिम सरहद्दीवरील बोर घाट आणि नैर्ऋत्य कोपऱ्यातील वरंधा घाट ह्या सह्याद्रीतील प्रमुख खिंडी या जिल्ह्याच्या सरहद्दीवरच आहेत.
सह्याद्रीच्या मूळ रांगेपासून पूर्व व आग्नेय दिशांस पसरलेले अनेक लहानमोठे डोंगर ही दुसरी पर्वतसंहती होय. या डोंगरांची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमीतमी होत जाते. यांत हरिश्चंद्र, शिंगी, तसुमाई, मांडवी, ताम्हीनी, अंबाला ,पुरंदर इ. डोंगरांचा समावेश होतो.
जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्चंद्र डोंगर असून हतकेश्वर हे त्यातील उंच शिखर आहे.
दक्षिणेस भीमा व भामा या नद्यांदरम्यान शिंगी डोंगर, भामा व इंद्रायणी नद्यांदरम्यान तसुमाई डोंगर, पवना व मुळा नद्यांदरम्यान मांडवी डोंगर, मुळा व मुठा यांदरम्यान ताम्हीनी डोंगर आणि मुठा-नीरा यांदरम्यान अंबाला या डोंगररांगा आहेत. ह्या सर्व डोंगररांगा सह्याद्रीचेच फाटे होत.
खंडाळा, लोणावळा, मळवली इ. थंड हवेची ठिकाणे आणि
शिवनेरी, राजमाची, रोरीगड, तोरणा, राजगड, लोहगड, सिंहगड, पुरंदर इ. इतिहासप्रसिद्ध किल्ले या जिल्ह्यातच आहेत.
जिल्ह्यात प्रामुख्याने तांबडी, तपकिरी आणि काळी अशा तीन प्रकारची मृदा आढळते.
काही ठीकाणी दोन प्रकारच्या मृदांचे मिश्रण आढळते.
पश्चिम भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि पुरंदर या साधारण डोंगराळ तालुक्यांमध्ये तांबडी मृदा आहे.
खेड व हवेली तालुक्यांचा पूर्व भाग आणि शिरूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांच्या पश्चिम भागात तपकिरी रंगाची
तर खेड, शिरूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांच्या पूर्व भागात आणि इंदापूर, बारामती या तालुक्यांत काळी मृदा आहे.
नद्यांच्या खोऱ्यांतील जमीन अधिक सुपीक आहे. जिल्ह्यांत बांधकामाचा दगड व चुनखडीव्यतीरिक्त अन्य खनिज संपत्ती नाही. चुनखडी मुख्यतः पूर्व भागात आढळते.
पुणे जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही, की ज्यातून लहान-मोठी नदी वाहत नाही. बहुतेक सर्व नद्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतात उगम पावून पूर्व किंवा आग्नेय दिशेने वाहतात.
भीमा, मीना, कुकडी, वेल, घोड, पुष्पावती, इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, नीरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत.
भीमा ही जिल्ह्यातील मुख्य नदी भीमाशंकर येथे उगम पावून आग्नेय दिशेने वाहते. प्रथम काही अंतर जिल्ह्याच्या मध्यमागातून व पुढे जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दिवरून वाहत गेल्यावर आग्नेय कोपऱ्यात नीर नदीसह सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. हिच्या वेल व घोड या डाव्या तीरावरील, तर भीमा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा या उजव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत.
घोड, मीना, कुकडी, पुष्पावती या नद्या जिल्ह्याच्या उत्तर भागाचे जलवहन करतात. मध्यभाग भीमा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापला आहे तर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून नीरा नदी वाहते.
जिल्ह्याच्या मुख्यतः पश्चिम भागात नद्यांवर धरणे बांधली असून, त्यांपासून जलसिंचन व काही प्रमाणात विद्युत्निर्मिती केली जाते.
हवामान : प. महाराष्ट्रातील मोसमी हवामान या जिल्ह्यातही आढळते. मे महिन्यात कमाल तापमान ४१० से.पर्यंत वाढते आणि जानेवारीत ते किमान ५·६० से.पर्यंत खाली जाते. उन्हाळ्यात वारे मुख्यतः वायव्य आणि पश्चिम दिशांकडून वाहतात व पावसाळ्यात ते नर्ऋत्य किंवा पश्चिमेकडून, तर हिवाळ्यात सामान्यतः ईशान्य किंवा पूर्वेकडून वाहतात. दक्षिणेकडून येणारे वारे आढळत नाहीत. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर अखेर पडणाऱ्या पावसाची सरासरी जास्त असते. सह्याद्रीमुळे घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो. त्याच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशात मात्र पावसाचे प्रमाण कमी होत जाते. पुणे शहराच्या पश्चिमेस ६५ किमी. अंतरावरील लोणावळा येथे सरासरी पाऊस ४३१ सेंमी. पडतो. पुणे येथे तो ६५ सेंमी. पडतो, तर त्याच्या पूर्वेकडील दौंड येथे तो ४५ सेंमी.पर्यंत कमी होतो. ७३० ४५’ पू.रेखावृत्तांदरम्यान पावसाचे मान अत्यल्प असते. त्यातही ते उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात कमी असते. इतर भागांप्रमाणे याही जिल्ह्यात मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस अनिश्चित असल्याने दौंड, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर, आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यांत वारंवार अवर्षण पडते. पैकी शिरूर व दौंड तालुक्यांत अवर्षणाची शक्यता तीन वर्षांतून एकदा व इतरत्र सहा वर्षांतून एकदा असते.
जिल्ह्यातील १,५२८ चौ.किमी. क्षेत्र जंगलाखाली आहे. पश्चिमेकडील डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांच्या भागातच जंगले टिकून आहेत.
जिल्ह्यात प्रामुख्याने तीन प्रकारची जंगले आढळतात :
(१) सदाहरित जंगले– ही जंगले पश्चिम भागात जास्त पावसाच्या प्रदेशातील डोंगरउतारांवर आढळतात. त्यांत साग, जांभूळ, खैर, हिरडा, ऐन इ. महत्त्वाची आहेत.
(२) पानझडी वृक्षांची जंगले- ही जंगले बऱ्याच भागांत विखुरलेली असून,त्यांत सावर, धावडा, ऐन, आंबा इ. प्रकार आढळतात.
(३) खुरट्या वनस्पती–जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त प्रदेशात ह्या वनस्पती असून त्यांत बोर, बाभूळ, लिंब इ. प्रकार आढळतात. जुन्नर, भोर, वेल्हे व पुरंदर तालुक्यांत साग खेड व आंबेगाव तालुक्यांत हिरडा मावळ व मुळशी या तालुक्यांत बांबू, शिकेकाई यांचे प्रमाण अधिक आहे. मुळा, मुठा व नीरा या नद्यांच्या काठांवरील गाळप्रदेशात बाभळीच्या झाडांचे अरुंद पट्टे तयार झाले आहेत.
१९७४-७५ मध्ये एकूण जंगलक्षेत्रांपैकी १,६५,२०५ हे. क्षेत्र राखीव व ३२,५०६ हे क्षेत्र अवर्गीकृत होते. राखीव जंगलांपैकी ४९,५७५ हे. क्षेत्र महसूल खात्याकडे आणि उरलेले क्षेत्र जंगल खात्याकडे होते. त्याचवर्षी या जंगलांपासून २,८२७ घ.मी. सरपण,५६६ घ.मी. इमारती लाकूड व चंदन, बांबू, हिरडा, करंजी, ताडी इ. किरकोळ उत्पादने मिळाली. एकूण उत्पादन ८,१२,२७८ रुपयांचे होते.
पूर्वी या जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाघ, रानडुक्कर, अस्वल, चितळ, भुंकणारे हरिण इ. प्राणी विपुल होते परंतु बेसुमार जंगलतोड व शिकार यांमुळे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. जंगलांमधून लांडगा, कोल्हा, तरस, सांबर, नीलगाय, ससा इ. प्राणी आढळतात. यांशिवाय खोकड, रानमांजर, मुंगूस, सायाळ इ. प्राणीही पुष्कळ आहेत. जिल्ह्यात सु. ३०० जातींचे पक्षी असून त्यांपैकी काही हिवाळ्यात व काही उन्हाळ्यात स्थलांतर करून येतात. त्यांत टील जातीची बदके, पाणलावा, करकोचा, भोरडी, चंडोल हे पक्षी महत्त्वाचे आहेत. रानकोंबडा, तितर, मोर, हिरवी कबुतरे इ. पक्षी सर्वसाधारणपणे जंगलांत आढळतात. पश्चिम भागातील डोंगराळ जंगली प्रदेश, पुण्याजवळील कात्रज तलाव, नद्यांचे डोह व धरणांचे जलाशय यांच्या परिसरात पक्षांचे प्रमाण अधिक आढळते. १९७७ मध्ये पुण्यास मुळा-मुठा नद्यांच्या काठी पक्षांचे अभयारण्य स्थापन करण्यात आले.
आर्थिक स्थिती : जिल्हाच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. या जिल्ह्यात कामकरी लोकांमध्ये शेतीक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण ५२·२५% असून, महाराष्ट्रात ते प्रमाण ६४·८८% आहे. (१९७१). जिल्ह्यात शेतीयोग्य जमीन १०,७१,००० हे. असून १९७३–७४ मध्ये १०,७०,७६५ हे. जमीन पिकांखाली होती तर पेरणीखालील निव्वळ क्षेत्र ९,५३,९९१ हे. होते. जिल्ह्यातील पिकांखालील एकूण क्षेत्रापैकी अन्नधान्याच्या पिकांखाली असलेल्या क्षेत्राचे प्रमाण १९७३-७४ मध्ये ७१·८٪ म्हणजे ७,६९,१७९ हे. होते. त्यात ज्वारी, बाजरी, भात, गहू, कडधान्ये इत्यादींचा अंतर्भाव होता. फळे व भाजीपाला यांनी व्यापलेले क्षेत्र २% म्हणजे २१,४९६ हे. होते. या जिल्ह्यातील अंजिरे प्रसिद्ध आहेत. ऊसाखाली १·७% म्हणजे १७,६८६ हे. क्षेत्र होते. बिगर-अन्नपिकांपैकी गळीताची धान्ये, कापूस यांचे १९७३–७४ मधील क्षेत्र पुढीलप्रमाणे होते : कापूस–१,६७१ हे. भुईमूग–२२, ३७३ हे. इतर गळिताची धान्ये–४०,९७१ हे.
जिल्ह्यातील १,२४,४९३ हे. जमिनीस जलसिंचनाचा लाभ झाला (१९७३-७४). त्यांपैकी ४९,०८४ हे. जमिनीस कालव्यांनी ५९,२३६ हे. विहरींद्वारे २,१०४ हे. तलावांद्वारे व १४,०६९ हे. इतर साधनांनी जलसिंचन उपलब्ध होते. येळवंडी नदीवरील लॉइड धरण (भाटघर), नीरा नदीवरील वीर धरण (वीर), यांशिवाय खडकवासला प्रकल्पात तीन धरणे असून ती मोसी (वरसगाव), अंबी (पानशेत) व मुठा (खडकवासला) या नद्यांवर आहेत. पवना नदीवरील पवना प्रकल्प (फागणे) तसेच कुकडी प्रकल्पात चिंचणी, डिंभे (घोड नदी) थेडगाव व माणिकडोह (कुकडी) वडज (मीना) व पिंपळगाव-जोगे (आर) ही धरणे येतात. यांशिवाय चासकमान, पुष्पावती बंधारा व नाझरे धरण इ. अन्य प्रकल्प आहेत . मार्च १९७५ अखेर ७३५ गावांचे व शहरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते.
जिल्ह्यात १९७२ मध्ये ६,३९,३७६ गुरे १,६०,८५९ म्हशी ३,०६,३५७ मेंढ्या ३,७७,४७४ शेळ्या व १२,१६,५१० कोंबड्या होत्या. दुभती जनावरे १,२९,०१२ होती. जिल्ह्यात ६५ पशुवैद्यकीय दवाखाने असून त्यांमध्ये वैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन इत्यादींच्या सोयी आहेत. नद्यांतून व धरणांच्या जलक्षेत्रांत मासेमारी चालत असून १९७३-७४ मध्ये १,१०,००० किग्रॅ. माशांचे उत्पादन झाले. व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे असे किरकिट, मुरेळ, शिवडा, झिंगे, मुरी इ. मासे सापडतात.
औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्रात या जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. १९७३ मध्ये १,१०८ उद्योग नोंदविले होते, पैकी ९१५ कार्यन्वित होते. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग हा प्रमुख औद्योगिक पट्टा आहे. त्यात टाटा एंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी (टेल्को), फिलिप्स इंडिया, किर्लोस्कर उद्योगसमूह, बजाज उद्योगसमूह, गरवारे नायलॉन्स, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज व खाजगी क्षेत्रातील इतर अनेक आधुनिक उद्योग अंतर्भूत होतात. शिवाय पिंपरीस हिंदुस्थान अँटिबॉयॉटिक्स हा औषधी कारखाना , खडकी येथील दारूगोळ्यचा कारखाना हे सरकारी क्षेत्रातील महत्त्वाचे कारखाने असून, वालचंदनगर येथील साखर व यंत्रसामग्रीचा कारखाना सणसर, माळेगाव, करंजे, थेऊर येथील सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने उल्लेखनीय आहेत. जुन्नर व मुंढवा येथील कागदकारखाने, पुणे व भोर येथील कापड गिरण्या, तळेगाव दाभाडे येथील काच कारखाना, दापोडीचा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा बस बांधण्याचा कारखाना इत्यादींनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासास हातभार लावला आहे. जिल्ह्यात एकूण सात औद्योगिक वसाहती आहेत. गुलटेकडी, लोणावळे, भोर व बारामती येथील औद्योगिक वसाहती सहकारी आहेत, तर हडपसर येथे पुणे महानगरपालिकेची, पर्वती येथे महाराष्ट्र सरकारची व पिंपरी-चिंचवड-भोसरी भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत आहे.
पुणे जिल्ह्यात दळणवळणाच्या साधनांचा चांगला विकास झालेला आहे. जिल्ह्यात १९७५ मध्ये एकूण ३११ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. पैकी २६७ किमी. रुंदमापी (त्यांमध्ये १४४ किमी. दुहेरी मार्ग) व ४४ किमी. अरुंदमापी होते. पुणे आणि दौंड ही रेल्वे प्रस्थानके आहेत. ८,५७८ किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी १,०२१ किमी. सरकारी व ७,५७७ किमी. जिल्हा परिषदेचे आहेत. सरकारी रस्त्यांमध्ये ३१४ किमी. राष्ट्रीय महामार्ग व ६११ किमी. राज्य महामार्ग आहेत. जिल्ह्यातून मुंबई-पुणे-बंगलोर (क्र.४), पुणे-सोलापुर-हैद्राबाद (क्र.९), पुणे-नासिक रोड (क्र.५०) हे राष्ट्रीय महामार्ग जातात. जि.प. रस्त्यांपैकी १,४२४ किमी. प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. यांशिवाय ६९७ किमी.चे नगरपालिकांचे रस्ते आहेत. जिल्ह्यातील एकूण रस्त्यांपैकी १३५ किमी. सिमेंटचे व ९०१ किमी डांबरी आहेत. पुण्याजवळच लोहगाव येथे विमानतळ आहे. जिल्ह्यात ८६,२६८ स्वयंचलित वाहने होती (१९७५). महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडे जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी आहे. महामंडळाने १९७४-७५ मध्ये ३६५ मार्गांवर दररोज सरासरी ३४७ गाड्यांतून ८२,०९३ किमी. वाहतूक केली व ९४,०८० प्रवाशांची ने-आण केली. जिल्ह्यात १९७४-७५ मध्ये ५६८ डाकघरे व १०८ तारघरे होती. पुणे येथे आकाशवाणी केंद्र व दूरचित्रवाणीचे सहप्रक्षेपण केंद्र असून १९७४ मध्ये २७,२३३ दुरध्वनी व १९७५ मध्ये २,३२,१७१ रेडिओसंच होते.
लोक व समाजजीवन : १९७१ च्या जनगणनेनुसार
जिल्ह्यातील ३१,७८,०२९ लोकसंख्खेपैकी
२७,३२,७०० हिंदू
१,५९,८०० मुस्लिम
५०,३०० ख्रिश्चन
१३,२०० शीख
१,६१,००० बौद्ध
४६,५०० जैन
व बाकीचे इतर धर्मीय होते. याच जनगणनेनुसार जिल्ह्यात १,७५,४०२ अनुसूचित जातींचे व
१,०८,४०५ अनुसूचित जमातींचे लोक होते.
लोकसंख्खेची घनता दर चौ. किमी.स २०३ होती. घनतेच्या प्रमाणात खेडी व शहरे यांत बरीच तफावत (दर चौ.किमी.स १२३ आणि २,३०१) आढळते. १९६१–७१ या दशकात जिल्ह्याची लोकसंख्या २८·८ टक्क्यांनी वाढली. पुणे शहर व त्याच्या परिसरातील औद्योगिक विकासामुळे हवेली तालुक्याची लोकसंख्या मात्र ४७ टक्क्यांनी वाढली . १९७४ मध्ये सरासरी जननमान दर हजारी २४·९ आणि मृत्युमान ८·५ होते. १९७१ च्या खानेसुमारीनुसार जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण ९३३: १,००० होते. भोर तालुक्यात मात्र स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक (१,०७३:१०००) होते. जिल्ह्यात २२ शहरे व १,४९८ खेडी होती (१९७१). शासनाने जाहीर केलेल्या एकूण २४ अनुसूचित जाती व २१ जमाती जिल्ह्यात आहेत.
अनुसूचित जातींपैकी मांग लोकांची (मांग गारुडी धरून) संख्या जास्त असून त्यांखालोखाल चांभार व महार आहेत.
अनुसूचित जमातींपैकी महादेव कोळी, कातकरी व ठाकूर या जमाती प्रमुख आहेत.
मुळशी, भोर व वेल्हे तालुक्यांत कातकरी आंबेगाव, मावळ , खेड व जुन्नर तालुक्यांत महादेव कोळी आणि ठाकूर यांची संख्या जास्त आढळते. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांपैकी बहुतेकांचा शेती हाच व्यवसाय आहे.
डोक्यावर रुमाल किंवा टोपी, अंगात पैरण, धोतर, पायात जाड वहाणा व खांद्यावर उपरणे असा त्यांचा पोशाख असतो . रोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी, थोडा भात, कांदा व मिरची यांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. शहरी लोकांच्या पेहरावात मात्र पाश्चात्य पद्धतीचे अनुकरण बरेच दिसते. जिल्ह्यात पोळा (विशेषतः ग्रामीण भागात), दिवाळी हे सण व गणेशोत्सव, शिवजयंती हे उत्सव थाटामाटाने साजरे होतात. पुणे शहरातील गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव विशेष प्रसिद्ध आहेत. यांशिवाय देहू, आळंदी, जेजुरी, करंजेे येथील नित्यनैमित्तिक यात्रांतही लोक उत्साहेने भाग घेतात.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे काम जिल्हा परिषदेच्या अधिकारकक्षेत येते. १९७४ साली जिल्ह्यातील एकूण १९ रुग्णालयांत आणि ३५ दवाखान्यांत ६,७५६ खाटा व १,४२४ परिचारिका होत्या तसेच ११ प्रसुतिगृहे होती. पुणे शहरातील ससून रुग्णालय, के. ई.एम. रुग्णालय, लुल्लानगर येथिल सैनिकी रुग्णालय व औंध येथील कामगार राज्य विमा योजनेद्वारा चालविलेले रुग्णालय, तळेगावचे सार्वजनिक रुग्णालय,येरवड्याचे वेड्यांचे रुग्णालय ही प्रसिद्ध आहेत. क्षय व कुष्ठरोग निवारणासाठीही जिल्ह्यात विशेष सोयी उपलब्ध असून क्षयरोग्यांसाठी औंध येथील रुग्णालय (४०० खाटा) व कोंढवे येथील कुष्ठरोग रुग्णालय विशेष सोयींनी सज्ज आहे. यांशिवाय खाजगी रुग्णालये व दवाखानेही आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात हा जिल्हा प्रगत आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण मुंबईखालोखाल असून ते ४४·६२% होते. यात पुरुषांचे प्रमाण ५६·३% व स्त्रियांचे ३२·१% होते. स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक सोयींचा विस्तार झाल्यामुळे जिल्ह्यातील साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. ‘विद्येचे माहेरघर’ समजल्या जाणाऱ्या पुणे शहर–तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वांत जास्त (६८·७% –१९७१) आणि वेल्हे तालुक्यात सर्वांत कमी (२१·६४% ) होते. १९७३-७४ साली जिल्ह्यातील २३ पूर्व प्राथमिक शाळांत २,७५८ विद्यार्थी आणि ९१ शिक्षक होते. २,९७८ प्राथमिक व ३४५ माध्यमिक शाळांत अनुक्रमे ५,०७,२१९ विद्यार्थी व १५,७४३ शिक्षक १,६७,३७२ विद्यार्थी व ६,०७४ शिक्षक होते. उच्च शिक्षणाच्या ४७ संस्थांमध्ये ४१,०९५ विद्यार्थी व २,०४५ अध्यापक होते. जिल्ह्यातील पुणे विद्यापीठ, पाषाण येथील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, खडकवासला येथील मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र, बी.जे. मेडीकल कॉलेज, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज व आयुर्वेदिक, अभियांत्रिकी, कृषीमहाविद्यालये इ. उच्च शिक्षणसंस्था तसेच खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, आर्वीचे भू-उपग्रह स्थानक प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यात, विशेषतः पुणे शहरात, सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा आहेत. मराठी ही जिल्ह्यातील ८५% लोकांची मातृभाषा आहे. ग्रामीण क्षेत्रात मराठी भाषा बोलणारे लोक ९५·५% आहेत. याखालोखाल उर्दू व हिंदी भाषिक असून नागरी विभागांत गुजराती, कन्नड, तेलगु, पंजाबी, तमिळ, सिंधी इ. भाषा बोलणारे लोकही आढळतात. जिल्ह्यातून १९७५ मध्ये ८ मराठी व २ इंग्रजी दैनिके २५ मराठी, ३ हिंदी व ४ इंग्रजी साप्ताहिके प्रसिद्ध होत होती. इतर नियतकालिकांत मराठी १४४, हिंदी १०, इंग्रजी २६ यांचा अंतर्भाव होतो. मराठी दैनिकांमध्ये केसरी, सकाळ, तरुण भारत, विशाल सह्याद्रिइ. प्रमुख आहेत. पूना डेली न्यूज व पूना हेरल्ड ही इंग्रजी दैनिके होत. यांतील बव्हंशी नियतकालिके पुणे शहरातूनच प्रसिद्ध होतात. जिल्ह्यात प्रकाशन व छपाई हे व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतात. पुण्यातील शाशकीय फोटोझिंको मुद्रणालय, येरवडा शासकीय मुद्रणालय ही प्रसिद्ध असून इतरही खाजगी छापखाने उत्तम मुद्रणासाठी प्रसिद्ध आहेत.
प्रेक्षणीय स्थळे : पुणे जिल्ह्याचे विविध भाग अनेकविध अशा ऐतिहासिक, साहित्यिक व शिल्पकलात्मक अलंकारांनी भूषित झालेले आहेत त्यांचे दर्शन घेणे अनेक दृष्टींनी बोधप्रद व आनंददायक आहे. ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टींनी पुणे जिल्ह्यातील अनेक स्थळे महत्त्वाची आहेत.
पुणे शहर विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक औद्योगिक महानगर म्हणून प्रसिद्ध आहे. [→ पुणे शहर].
छ. शिवाजी महाराजांजे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, त्याचप्रमाणे तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, राजगड, लोहगड इ. इतिहासप्रसिद्ध किल्ले याच जिल्ह्यात आहेत.
वेल्हे येथील हेमाडपंथी विहीर,
पूर येथील मंदीर, तर
माणकेश्वर येथील मंदीराचे अवशेष
भाजे, कार्ले व बेडसे येथील लेणी
संत ज्ञानेश्वरांची समाधी असलेले पवित्र तीर्थक्षत्र आळंदी,
संत तुकारामांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले देहू, तर
सोपानदेवांच्या समाधिमुळे विख्यात असलेले सासवड
ओझर, थेऊर, रांजणगाव, मोरगाव व लेण्याद्री ही अष्टविनायकांपैकी पाच तीर्थक्षेत्रे,
नरसापूर जवळील बनेश्वर मंदिर,
खंडोबाची जेजुरी,
भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग,
करंजे येथील सोमनाथाचे मंदीर इ. देवस्थाने व
लोणावळा-खंडाळा ही गिरिस्थाने भाविकांची व प्रवाशांची आकर्षणे आहेत. (चित्रपत्रे ८, २३).
वाघ, दि. मु. चौंडे, मा. ल. चौधरी, वसंत गाडे, ना. स.
“
No comments:
Post a Comment