आनंदा, पळ लौकर तुह्य म्हातारं हुडकीतंय ... ते बग हिकडंच आलंय लका...
आनंदाला पळायची संधीच मिळाली नाही... आणि अजिनाथनं डायरेक्ट गच्चूरं पकडलं... दोन व्हलगाडीत ठेवून दिल्या...
आनंदा आज रेड हॅण्ड सापडला व्हता... त्याला गयावया करायला चॅनसच नव्हता तसा ?
शेजारच्या बाबुश्यानंच कळ केलेली दिसतीय... त्यानंच आजीनाथला सांगितलं... दादा, आनंदा बिरुबाच्या देवळामागं बिडया फुकतया म्हणून...
एकूलता एक सदरा , अजिनाथाच्या रागात टरारा फाटला व्हता... नाहीतरी आनंदाला या सदऱ्याचा विटाळ व्हताच की... आनंदा पैलवान गडी... सदऱ्यात हडकुळाच वाटायचा..वाटणारंच ना अजिनाथच्या भाऊ श्रावणाचा होता तो...
श्रावण ही पैलवान होता... समद्या रत्नापूरात आणि पंचक्रोशीत जबर दरारा... पण दुस्मानानं गोड बोलून घात केला... कुणीतरी मुठ फुकली आणि आणि रक्ताची गुळणी होऊन मेला...
कितीक वर्ष आजिनाथ इठ्ठयावर दात खाऊन होता... अक्क्या गावात त्योच देवरूसपणा करायचा त्याच्याकडंच गोटं दयाव हायतं... इठ्ठया भानामती, चिटूक करतो हे समद्या गावाला म्हाईत हाय...
अजिनाथ रागीट गडी... मोडंन पण वाकणार न्हाय... मरंण पण शरण जाणार नाही...
श्रावण मेल्यावं जगण्यात काय अर्थच नाही म्हणून जीवाचं बरं वाईट करुन घ्यायला निघालेला अजिनाथला गावानं धीर दिला...
शेवटी तोच गावचा वतनदार महार होता...
गावावर निजामशाही ... रझाकाराचा अंमल व्हता... अजिनाथाचा आजा अप्पा महार धाडशी व्हता... असं म्हणत्यात गावात आधी तोच व्हता...
ती म्हणत्यात नव्हं आधी महार मंगच श्रुष्टी साकार तसंच कायतरी...
गावात कानुबाच्या माळावर लै जुना किल्ला व्हतां.. ज्याची कुठंबी दुर्दैवानं नोंद झाली नाही...
निझामं देवळं पाडायची, मंदिरं पाडायची... जुन्या माणसांकडनं खजिना असा उलेख जरी आला की... खोदून खोदून इच्चारायची... भेदारलेली माणसं धन ठिवाय जागा नसल्यानी पुरून ठिवायची... आणि मंग तसंच इसरून जायची मरून जायची... पुरल्यालं धन सरकतं म्हणत्यात...
असू द्या आपल्याला काय त्याचं...
अप्पा महार वतनदार... तसा रुबाबदार गडी...
पेशवाईच्या आधीचा त्यामुळे एवढा बाट नशिबी आलाच नव्हता.. अन् नायतरी अप्पाच्या इरूधात कोणाची टाप हाय ... हे सणकी गडी.. घोटयात मेंदू असल्यालं...
मारूतीचं देवाळ बांधायच्या वक्ती अक्का मारूती एकटयानं खंदयाव आणलेला...
बाबू वडराच्या बापानं घडविला होता... गावातलं समदी वाडं त्यानंच बांधलं व्हतं म्हणत्यात... गावातनं जुना पैठण पंढरपूर रस्ता गेलेला आहे... अजूनबी एकनाथ महाराजाची पालखी नियमितपणे जातीय...
निझामांनी गाव लुटला व्हता... पैश्या पाण्यानी आणि बायकांच्या इज्जतीनी गावाला निजाम हैवानावानी वाटायचा पर प्रत्यक्षात ते निझामाचे रझाकार असायचं....
हैद्राबादच्या निझामाची राजधानी नगर होती.. आणि उपराजधानी परांडा होतं...
No comments:
Post a Comment