Saturday, August 1, 2020

मातृतीर्थ सिंदखेडराजा


मातृतीर्थ सिंदखेडराजा

 | Updated: 19 Oct 2013, 02:35:00 AM

सिंदखेडराजा येथे शिवपूर्व काळातील समाजव्यवस्था, राहणीमान, कलासंस्कृती, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, राजकीय व्यवस्था आदी ऐतिहासिक वारशाच्या अनेक खाणाखुणा बघायला मिळतात. त्यात जिजाऊंचा जन्म झाला तो त्यांचे वडील लखुजी जाधव यांचा वाडा, त्यांची समाधी, नीळकंठ मंदिर, रामेश्वर मंदिर, मोती तलाव, बारव आदी ऐतिहासिक वैभवाचा समावेश आहे.

>>संदीप भारंबे

सिंदखेडराजा येथे शिवपूर्व काळातील समाजव्यवस्था, राहणीमान, कलासंस्कृती, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, राजकीय व्यवस्था आदी ऐतिहासिक वारशाच्या अनेक खाणाखुणा बघायला मिळतात. त्यात जिजाऊंचा जन्म झाला तो त्यांचे वडील लखुजी जाधव यांचा वाडा, त्यांची समाधी, नीळकंठ मंदिर, रामेश्वर मंदिर, मोती तलाव, बारव आदी ऐतिहासिक वैभवाचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे सिंदखेड राजा हे जन्मस्थान. जिजाऊंची शिकवणूक, संस्कार व प्रेरणेतून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले होते. त्यामुळे सिंदखेड राजा हे खऱ्या अर्थाने स्वराज्य आणि सुराज्य निर्मितीचे स्फूर्तिस्थान आहे. महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य ऐतिहासिक वारसा जेथून सुरू होतो असे हे मातृतीर्थ होय. जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्र एका भावनिकसूत्रात बांधला गेला आहे. जिजाऊंचे माहेर विदर्भ. त्यांचे सासर मराठवाड्यातील वेरूळ. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला पश्चिम महाराष्ट्रात आणि शिवरायांना छत्रपती झालेले पाहून कृतार्थ झाल्यानंतर जिजाऊंनी देह ठेवला ते रायगडाच्या पायथ्याशी असलेले पाचाड हे ठिकाण कोकणात, असे हे भावसूत्र आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे सध्या तालुक्याचे ठिकाण आहे. येथे शिवपूर्व काळातील समाजव्यवस्था, राहणीमान, कलासंस्कृती, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, राजकीय व्यवस्था आदी ऐतिहासिक वारशाच्या अनेक खाणाखुणा बघायला मिळतात. त्यात प्रामुख्याने जिजाऊंचा जन्म झाला तो त्यांचे वडील लखुजी जाधव यांचा वाडा, त्यांची समाधी, नीळकंठ मंदिर, रामेश्वर मंदिर, मोती तलाव, बारव आदी ऐतिहासिक वैभवाचा समावेश आहे. सिंदखेडराजाचे मूळ नाव नेमके काय होते याबाबत अनेक आख्यायिका आहेत. सिंदुराजनामक राजाने हे गाव वसविले होते. पुढे अपभ्रशांतून ते सिंदखेड झाले असावे, असे सांगितले जाते. काहींच्या मते गावाच्या भोवताली सिंदी वृक्षाची झाडे अधिक असल्याने त्याचे नाव सिंदखेड पडले असावे. नीळकंठेश्वर मंदिरातील शिलालेखावर ‘परगणे सिद्‍पूर’ असा उल्लेख आढळतो. यावरून हे सिद्ध पुरुषांचे गाव असावे, असेही मत आहे. त्याचे पुढे सिंदखेड झाल्याचे मानले जाते. सिंदखेडची ओळख अधिक ठळक करण्यासाठी राजांचे गाव म्हणून सिंदखेडराजा असे झाले.

सिंदखेड राजाचा निश्चित इतिहास पुढे येत नाही; परंतु नीळकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, पुतळा बारव, शिलालेख या अवशेषांवरून हे शहर १२व्या शतकापासून अस्तित्वात होते, असे स्पष्ट होते. प्राचीन काळात येथे बहमनींची सत्ता होती. अलाउद्दीन अहमद या बहमनी सुलतानाने तेथील काजीस १४५० साली हा परगणा जहागीर म्हणून दिला होता. या घराण्याने जवळपास १०० वर्षे जहागिरी उपभोगली. त्यानंतर सिंदखेड राजाची सूत्रे पराक्रमी जाधव घराण्याकडे आली. या घराण्यातील लखुजी जाधव हे पराक्रमी सरदार होते. त्यांनी मोगल आणि निजामशाहीत सेवा दिली. मलिक अंबरच्या निधनानंतर निजामशाहीत कारभारी नेमण्यावरून झालेली उलथापालथ लखुजी जाधव व अन्य सरदारांना चिंतेत टाकणारी होती. त्यात लखुजी जाधव मोगलशाहीत जाणार असल्याचे कुणीतरी निजामशहाच्या कानावर टाकले. त्यानंतर कट रचण्यात आला आणि लखुजी जाधव यांना दरबारात येण्याचा निरोप गेला. लखुजी जाधव, त्यांचे पु्त्र राघव, यशवंत व अचलोजी दौलताबादच्या किल्ल्यातील दरबारात पोहोचताच दगाफटका करून त्यांना ठार करण्यात आले. त्यानंतर लखुजी जाधवांच्या भावांनी मोगलांना जवळ केले. पुढे हैदराबादच्या निजामाकडे सत्ता गेल्यानंतर सिंदखेडराजा निजामशाहीत आले.

सिंदखेडराजा या गावाची निर्मिती अतिशय कल्पकतेने करण्यात आली होती. जेथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, तो लखुजी जाधव यांचा वाडा वास्तुकला आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. या राजवाड्याची उभारणी १५७६मध्ये पूर्ण झाली. राजवाड्याचे भव्य प्रवेशद्वार तेथील समृद्धीची साक्ष देते. दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार तीन मजली आहे. सर्वप्रथम खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षक भिंत असलेला सज्जा आहे. प्रवेशद्वारावर दगडांत कोरलेले १४ नारळांचे तोरण आहे. सद्यस्थितीत केवळ एक-दोन नारळांच्या शिल्पकृती मूळ स्वरूपात आहे. प्रवेशद्वाराची उंची ११.६५ मीटर आहे. राजवाड्याला भक्कम तटबंदी होती. त्यावर टेहळणीसाठी आवश्यक यंत्रणाही होती. राजवाड्यात १२ दालने, वैशिष्ट्यपूर्ण तळघर, त्यात हवा येण्यासाठीची व्यवस्था होती. परंतु आता त्यातील अनेक वास्तूंचे केवळ काही अवशेषच शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यास जुन्या तोफा व इतर साहित्य दिसते. थोडे पुढे गेल्यानंतर म्हाळसा महालाचे अवशेषच दिसतात. जिजाऊंचा जन्म येथेच झाला होता. सध्या तेथे एक दगडी खोली असून त्यात जिजाऊ व बालशिवाजीचा पुतळा बसविला आहे. दारावर ‘जिजामाता जन्मस्थान’ अशी पाटी आहे. जिजाऊंचे बालपण येथेच गेले. त्यांचा विवाह होईस्तोवर त्यांच्या आई-वडिलांनी जिजाऊंना आदर्श संस्कार दिले. त्यांना स्वभिमानी व करारी बाणाही शिकविला. स्वराज्य व सुराज्याची पायाभरणी अशी सिंदखेडराजा येथेच झाली होती, असे म्हणायला हरकत नाही.

या जवळच नृत्यमहाल किंवा कंचनी महाल आहे. काही अंतरावर लखुजी जाधव यांची समाधी आहे. तीही शिल्पकलेच्यादृष्टीने कल्पक आहे. प्रवेशद्वारावर हत्तीस्वार सिंहाच्या दोन मूर्ती आहेत. शिलालेखही आहे. सिंदखेड राजा-जालना मार्गावर मोती तलाव आहे. देऊळगावहून सिंदखेडमध्ये प्रवेश करताच चांदनी तलाव दिसतो. मोती तलाव-चांदणी तलाव हे दोन्ही तलाव जलअभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत. लखुजी जाधव यांच्यापूर्वीचे नीळकंठ आणि रामेश्वर ही मंदिरे आहेत. जवळपास २५ देवालये, मठ, तीन मशीदी, दोन दर्गे, चावड्या, वाडे, पुष्करण्या आदी वैभव येथे आहे.

ऐतिहासिक सिंदखेड राजाच्या विकासाकडे पेशवे काळ व इंग्रज काळात दुर्लक्ष झालेच. महाराष्ट्र निर्माण होऊन २० वर्षे उलटल्यानंतर राज्य सरकारचे या ऐतिहासिक स्थळाकडे लक्ष गेले. शिवशाहिरांनी या स्थळाचे महत्त्व घरोघरी पोहोचविल्यानंतर सरकारला बऱ्यापैकी जाग आली. मात्र अद्यापही येथील ऐतिहासिक वास्तू दुरवस्थेत आहेत. शनिवारवाडा, लाल किल्ल्याप्रमाणे येथील देखभाल होत नाही. ऐतिहासिक वस्तूंचे चांगले प्रदर्शनही भरत नाही. अनेक ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली आहे. शिलालेख भग्न पावले आहेत. मराठा सेवा संघ सिंदखेड राज्याच्या परिसरात ‘शिवसृष्टी’ उभारीत आहे. दरवर्षी १२ जानेवारीला मोठा जिजाऊ जन्मोत्सव होतो. पुढील पिढीला इतिहास सांगायचा असेल तर सिंदखेराजात ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी संशोधन करण्याची मोठी गरज आहे. ही स्थळे प्रेक्षणीय व्हावीत, असा प्रयत्न होणे गरजेचे आहे. समुद्रात १०० कोटी खर्चून शिवरायांचे स्मारक जरूर बांधले जावे. ते करताना राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये, इतकेच.

नियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..?

*

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...